31.9 C
Latur
Wednesday, February 5, 2025
Homeमहाराष्ट्रविरोधी पक्षाचा चहापानावर बहिष्कार

विरोधी पक्षाचा चहापानावर बहिष्कार

कायदा आणि सुव्यवस्था ढासळली, विरोधक आक्रमक
– हे तर ईव्हीएम च्या बळावर
सत्तेवर आलेले सरकार

नागपूर : प्रतिनिधी
परभणीत संविधान प्रतिकृतीची विटंबना झाल्यानंतर पोलिसांनी आंबेडकरी अनुयायांवर केलेला लाठीहल्ला, बीड जिल्ह्यातील सरपंच हत्येच्या गुन्ह्यातील आरोपी वाल्मिक कराडचे सत्ताधारी पक्षाचे आमदार धनंजय मुंडे यांच्याशी असलेले संबंध आणि मारकडवाडीतील नागरिकांचे आंदोलन दडपण्यासाठी दाखल करण्यात आलेले गुन्हे लक्षात घेता राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे ढासळली असल्याची टीका करत विरोधी पक्षाने रविवारी हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सरकारच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या चहापानावर बहिष्कार टाकला. हा निर्णय जाहीर करण्यासाठी आयोजित पत्रकार परिषद बोलताना आघाडीच्या नेत्यांनी महायुती सरकारला विविध मुद्यांवरून लक्ष्य केले.

राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला आज, सोमवारपासून येथे सुरुवात होत आहे. राज्य सरकारच्या वतीने रविवारी विरोधी पक्षाला चहापानाचे निमंत्रण देण्यात आले होते. मात्र, विदर्भातील अनुशेष, सोलापूर जिल्ह्यातील मारकडवाडीतील ग्रामस्थांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे, परभणीतील हिंसाचार, बीड जिल्ह्यात सरपंचाची झालेली हत्या, शासकीय रुग्णालयात झालेला बनावट औषधांचा पुरवठा, शेतकरी आत्महत्या, सरकारी सेवेतील रिक्त पदे, राज्यावर असलेला आठ लाख कोटी रुपयांच्या कर्जाचा बोजा आदी मुद्दे उपस्थित करत विरोधी पक्षाने सरकारच्या वतीने आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या रामगिरी या शासकीय निवासस्थानी आयोजित चहापानाच्या कार्यक्रमाला न जाण्याचा निर्णय घेतला. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी या निर्णयाची माहिती दिली.

राज्यातील सरकार शेतकरी विरोधी, दलितांवर अत्याचार करणारे आणि दिवसाढवळ््या खून करणारे असल्याचा गंभीर आरोप करत दानवे म्हणाले, हे सरकार ईव्हीएमच्या आधारावर सत्तेत आले आहे. आज दुधाचे दर घसरल्याने शेतक-यांची दयनीय अवस्था झाली आहे. परभणी येथे संविधानाची विटंबना झाल्यावर उमटलेल्या पडसादानंतर झालेल्या कोंबिग ऑपरेशनदरम्यान अटक केलेल्या सोमनाथ सोमवंशी या तरुणाचा कारागृहात मृत्यू झाला. अशा सर्व घटना घडत असताना मुख्यमंत्री हे मिरवणुकीत गुंतले आहेत, अशी टीका अंबादास दानवे यांनी केली.

दरम्यान, अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर अंबादास दानवे यांच्या शासकीय निवासस्थानी आज महाविकास आघाडीची बैठक पार पडली. या बैठकीला विजय वडेट्टीवार, नाना पटोले, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे गटनेते जितेंद्र आव्हाड, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मुख्य प्रतोद सुनील प्रभू, महेश सावंत, ज. मो. अभ्यंकर आदी उपस्थित होते. मात्र, ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे,भास्कर जाधव, शरद पवार गटाचे जयंत पाटील नागपूरमध्ये पोहचले नसल्याने बैठकीला अनुपस्थित होते.

वैदर्भीय जनतेचा
अपेक्षाभंग : वडेट्टीवार
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून विदर्भाचे मुख्यमंत्री झाल्यावर नागपूरात पहिले अधिवेशन होत असताना हिवाळी अधिवेशनाचा कालावधी कमी करून महायुती सरकारने वैदर्भीय जनतेचा अपेक्षाभंग केल्याची टीका काँग्रेसच्या विजय वडेट्टीवार यांनी यावेळी केली. शाहू फुले आंबेडकरांच्या पुरोगामी महाराष्ट्रात संविधानाची विटंबना झाली. त्यानंतर कोम्बिंग ऑपरेशनच्या माध्यमातून कारवाई केली. यात कार्यकर्त्याचा मृत्यू झाला असून ही घटना संतापजनक आहे, असे वडेट्टीवार म्हणाले. बीडमध्ये एका सरपंचाचे अपहरण करून त्याची निर्घृण हत्या केली हेही धक्कादायक असल्याचे म्हटले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR