स्थानिक रहिवाशांना प्राधान्य देण्याचे आदेश, वाद पेटणार
मुंबई : प्रतिनिधी
दहा पटसंख्येच्या शाळांत डीएड, बीएडधारकांची कंत्राटी तत्त्वावर नियुक्तीची अंमलबजावणी शिक्षण विभागाने सुरू केली आहे. कंत्राटी पद्धतीने शिक्षकाची निवड करताना उमेदवार ग्रामपंचायत हद्दीतील स्थानिक रहिवाशी असावा, अशी अट घालण्यात आली. शिक्षण आयुक्तालयाने नियुक्तीबाबत शिक्षणाधिका-यांना नियुक्तीबाबत आता १० अधिकच्या सूचना केल्या आहेत. शिक्षकांसह पात्रताधारकांच्या विरोधानंतरही सरकारने कंत्राटी शिक्षक भरतीची प्रक्रिया सुरु केली.
राज्यातील वीस व वीसपेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये कंत्राटी तत्त्वावर शिक्षकांच्या नियुक्तीचा निर्णय घेतला होता. विरोधानंतर पंधरा दिवसात निर्णयात बदल करत दहा व दहापेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांसाठी निर्णय घेण्यात आला. निर्णयानंतर आता भरतीची प्रक्रिया सुरु करण्यात आली असून भरती करताना निर्णयातील तरतुदीशिवाय अधिकच्या सूचना शिक्षण विभागाने शिक्षणाधिकारी कार्यालयाने केल्या आहेत. उमेदवाराची निवड करताना उमेदवार संबंधित शाळेच्या ग्रामपंचायत हद्दीतील स्थानिक रहिवाशी असावा, अशी दक्षता घ्यावी लागणार आहे. ग्रामपंचायत हद्दीतील उमेदवारांचे अर्ज न आल्यास तालुका, जिल्ह्यातील उमेदवारांचा विचार केला जाऊ शकतो. २०२३-२४ च्या संचमान्यतेनुसार ही नियुक्ती होणार आहे. पटसंख्या वाढली तर नियमित शिक्षण देण्याबाबत कार्यवाही करण्यात येईल.
पद रिक्त असेल
तर कंत्राटी शिक्षक
कमी पटसंख्या असलेल्या शाळांत दोन शिक्षक कार्यरत असल्यास त्यापैकी एक शिक्षकांचे प्रचलित कार्यपद्धतीचा अवलंब करून समायोजन झाल्यावर प्रत्यक्ष पद रिक्त झाल्यानंतरच अशा शाळेतील दुसरा शिक्षक कंत्राटी नियुक्त करावा, असे स्पष्ट करण्यात आले. अधिक अर्ज आल्यास अर्हतेमध्ये अधिक गुण असणा-या उमदेवाराचा विचार करण्यात यावा, अशाही सूचना आहेत.
तात्पुरत्या नियुक्तीचे निर्देश
शासन निर्णयाप्रमाणे दहा व दहापेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांतील दोन शिक्षकांपैकी एका शिक्षक पदावर डीएड, बीएड अर्हताधारकांमधून अर्ज मागवून तात्पुरती नियुक्तीची कार्यवाही करावी, असे निर्देश सहसंचालक दिलीप जगदाळे यांनी दिले आहेत. कडाडून विरोध होत असतानाही ही भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.