लातूर : प्रतिनिधी
विलासराव देशमुख फाउंडेशनने महापूरमधील महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी आणखी एक महत्त्वपूर्ण उपक्रम सुरु केला आहे. गावात मोफत शिलाई मशीन प्रशिक्षण केंद्राचा शुभारंभ रेणा सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन प्रवीण पाटील आणि विलासराव देशमुख फाउंडेशनच्या समन्वयक संगीता मोळवणे यांच्या हस्ते करण्यात आला.
ट्वेंटीवन अॅग्रीच्या संचालिका सौ. अदितीताई अमित देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली विलासराव
देशमुख फाऊंडेशनच्या पुढाकारातून ग्रामीण भागातील महिलांसाठी रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी, या उद्देशाने विलासराव देशमुख फाउंडेशनने हे मोफत शिलाई मशीन प्रशिक्षण केंद्र सुरु केले आहे. महापुर येथे सुरु झालेल्या या केंद्रात महिलांना ३ महिन्यांचे मोफत शिलाई प्रशिक्षण दिले जाईल, ज्यामुळे त्या स्वत:चा व्यवसाय सुरु करुन आर्थिकदृष्ट्या सक्षम बनू शकतील. प्रशिक्षणात शिलाईच्या विविध पद्धती शिकवल्या जाणार आहेत. या प्रशिक्षण केंद्राच्या शुभारंभाला गावच्या सरपंच कल्पना माने, वारकरी संप्रदायाचे जिल्हाध्यक्ष शरद देशमुख, संदीप माने, संस्थेचे गजानन बोयणे आणि गावातील अनेक महिलांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला.