लातूर : प्रतिनिधी
तालुक्यातील वैशालीनगर निवळी येथील विलास सहकारी साखर कारखाना लिमिटेड येथे ऊस वाहतूक करणा-या वाहनांना रस्ते वाहतूक सुरक्षिततेच्या दृष्टीने रिफ्लेक्टर लावण्याचा विशेष कार्यक्रम झाला. साखर कारखान्याचे गळीत हंगाम सुरु असून यामुळे ऊसवाहतुकीसाठी वाहनांची मोठी रस्त्यावर वर्दळ आहे. विलास कारखान्याच्या ऊस वाहतूक करणा-या ट्रक, ट्रॅक्टर, मिनीट्रॅक्टर, बैलगाडी व हार्वेस्टर पाठीमागील बाजूस हे रिफ्लेक्टर लावण्यात आले आहेत. रात्री, अपरात्री ऊसाने भरलेली वाहने रस्त्यावरून जाताना अपघात होवू नये हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
या कार्यक्रम प्रसंगी आरटीओ सचिन राठोर, आरटीओ अंजली पाथरे, मुरुडचे पोलीस निरीक्षक ए. एन. उजगर, गातेगावचे पोलीस निरीक्षक केंद्रे या अधिका-यांनी यावेळी वाहन चालक व बैलगाडी चालकांना अनेक महत्त्वपूर्ण मार्गदर्शक सूचना दिल्या. या प्रसंगी बोलतांना वाहनांना सुरक्षिततेसाठी मागील बाजूस रिफ्लेक्टर लावणे आवश्यक आहे.
वाहन चालवताना मोठ्या आवाजात टेप रेकॉर्डर लावू नये. विना लायसन गाडी चालवू नये, चालकाने लायसन सोबत ठेवावे, वाहने नेहमी रस्त्याच्या डाव्या बाजूने चालवावीत. मद्यपान करून वाहन चालवू नयेत, वाहन रस्त्यावर उभा करतांना नियमानुसार करावे, दगड, फांद्या वापरानंतर रस्त्यावरुन काढून टाकाव्यात आदी महत्वपूर्ण सुचना दिल्या. कार्यक्रमाच्या प्रारंभी कारखान्याचे कार्यकारी संचालक आबासाहेब पाटील यांनी उपस्थित परिवहन अधिकारी आणि पोलीस अधिका-यांचे स्वागत करून त्यांच्या मार्गदर्शनाबद्दल आभार मानले. यावेळी कारखान्याचे सर्व खातेप्रमुख, विभागप्रमुख, कर्मचारी तसेच वाहन मालक, चालक व बैलगाडी चालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार सचिव कोळोखे यांनी मानले तर सूत्रसंचालन चाँद शेख यांनी केले.

