लातूर : प्रतिनिधी
विलास सहकारी साखर कारखाना, वैशालीनगर, निवळी ता. लातूर या कारखान्याचा गळीत हंगाम २०२४-२५ नुकताच संपला असून या हंगामातील गाळप झालेल्या उसाला उस बीलापोटी ऊसउत्पादक शेतक-यांना प्रति मेट्रिक टन २७०० रुपयांप्रमाणे ऊस बिलाचा पहीला हप्ता देण्यात आला आहे, तर गळीत हंगाम संपताच एफ.आर.पी. पोटी दुसरा हप्ता १०० रुपये शेतक-यांच्या खात्यावर जमा करण्यात आला आहे.
मांजरा परिवारातील विलास सहकारी साखर कारखाना सहकार आणि साखर उद्योगात अग्रगण्य ठरला आहे. विलास कारखाना उभारणीपासून सभासद, ऊस उत्पादक शेतकरी आणि साखर कारखान्याशी निगडीत सर्वच घटकांसाठी चांगले काम करीत आहे. यातून शेतकरी व कारखाना यांचे एक विश्वासाचे नाते निर्माण झाले आहे. ते विश्वासाचे नाते कायम ठेवत कारखान्याने आपली वाटचाल सुरु ठेवली आहे. यावर्षी पर्जन्यमान चांगले झाले असून ऊसाची गुणवत्ता चांगली आहे. विलास साखर कारखान्याने या गळीत हंगामात ९२ दिवसात ३ लाख ८३ हजार २११ मे. टन उसाचे गाळप करुन ४ लाख ३८ हजार ७८० क्विंटल साखरचे उत्पादन घेतले आहे. हंगामात सरासरी साखर उतारा ११.७५ मिळाला आहे.
मांजरा परिवाराचे मार्गदर्शक राज्याचे माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख, कारखान्याचे संस्थापक चेअरमन माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख, लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन तथा माजी आमदार धिरज विलासराव देशमुख आणि चेअरमन श्रीमती वैशालीताई विलासराव देशमुख यांच्या मार्गदर्शनानुसार गळीत हंगाम २०२४-२५ मध्ये गाळपास येणा-या ऊसाला प्रति मे. टन ३ हजार रुपये प्रमाणे ऊसदर देण्याचे धोरण जाहीर झाले आहे. त्या प्रमाणे सदर गळीत हंगामात गाळपास आलेल्या ऊसास ऊस दरापोटी प्रति मे. टन २७०० रुपयेप्रमाणे ऊस बीलाचा पहीला हप्ता दिला आहे, दुसरा हप्ता १०० रुपये शेतक-यांच्या खात्यावर जमा करण्याचा निर्णय घेतला असून ज्या शेतक-यांनी कारखान्यास ऊस पुरवठा केला आहे, त्यांच्या खात्यावर ही रक्कम वर्ग करण्यात आलेली आहे. तर उर्वरीत ऊसबीलाची रक्कम लवकरच अदा करण्यात येणार आहे, अशी माहीती कारखान्याचे व्हा. चेअरमन रविंद्र काळे, कार्यकारी संचालक संजीव देसाई यांनी दिली आहे.