लातूर : प्रतिनिधी
साखर आयुक्तालय पुणेचे संचालक (अर्थ) यशवंत गिरी यांनी येथील विलास सहकारी साखर कारखान्यास दि. १२ जुलै रोजी सदिच्छा भेट दिली. या प्रसंगी त्यांनी मांजरा परिवारातील संस्थांच्या कामकाजाचे कौतूक करुन ऊस तोडणी यांत्रिकीकरण व आर्थिक नियोजनाबाबत गौरोद््गार काढले.
प्रारंभी कारखान्याच्या वतीने व्हाईस चेअरमन रवींद काळे यांनी यशवंत गिरी यांचे स्वागत केले. या भेटीमध्ये त्यांनी कारखान्याच्या कामकाजाचा आणि कारखान्याची आर्थिक स्थितीचा बारकाईने आढावा घेऊन समाधान व्यक्त्त केले. शासकीय देणीची मुदतपूर्व परतफेड, एफ.आर. पी. चे संपूर्ण पेमेंट, कर्मचारी देणी थकीत नाहीत व सर्व कर्जाची वेळेत परतफेड तसेच मांजरा परिवारातील व्यवस्थापन व प्रशासनाने ऊस उत्पादकता वाढवणे, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, शेतक-यांसाठी प्रशिक्षण, कर्मचारी आणि शेतक-यांचे कल्याण, व्यवस्थापनाने केलेल्या उत्तम आर्थिक नियोजनाचे आणि कल्याणकारी निर्णयांचे त्यांनी कौतुक केले.
विलास सहकारी साखर कारखान्याने उभारणीपासून सर्वच हंगाम यशस्वीपणे पार पाडून सभासद, ऊसउत्पादक शेतकरी यांच्या हिताचे काम केले आहे. विलास कारखान्यासह मांजरा परिवारातील सर्व कारखान्यांची कामगिरी, आर्थिक नियोजन, सभासद, कर्मचारी योजना, प्रशासकीय कामकाज, व्यवस्थापकीय धोरण सहकार आणि साखर उद्योगासाठी अनुकरणीय असल्याचे साखर आयुक्त्तालय, पुणेचे संचालक यशवंत गिरी यांनी म्हटले आहे.
कारखान्याच्या वतीने ऊस उत्पादकता वाढवणेसाठी कारखान्याने ऊस विकास, एकरी ऊसाची उत्पादकता, पाणी व्यवस्थापन आणि ऊस तोडणी यांत्रिकीकरण यांमध्ये लक्षणीय कामगिरी केली आहे. तसेच आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन कारखान्याने ठिबक सिंचन, माती परीक्षण, पथदर्शक ऊस लागवड, सुधारीत वाणांचा वापर यांसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. आधुनीक ऊसशेतीसाठी शेतक-यांना प्रशिक्षण देण्यासाठी कारखान्याने कृषी विभागातील कर्मचारी आणि ऊस उत्पादक शेतक-यांना नियमितपणे प्रशिक्षण दिले आहे. कर्मचारी आणि शेतक-यांचे कल्याण करणा-या विविध योजना राबविल्या त्यांचे कौतूक याप्रसंगी यशवंत गिरी, यांनी केले.
सहकारमहर्षि माजी मंत्री दिलीपराव देशमुख, माजी मंत्री, आमदार कारखान्याचे संस्थापक चेअरमन अमित विलासराव देशमुख, चेअरमन श्रीमती वैशालीताई विलासराव देशमुख, आमदार धिरज विलासराव देशमुख आणि संचालक मंडळाने ऊस लागवड आणि ऊस तोडणीसाठी ऊसशेती यांत्रीकीकरण योजना राबवली. विशेषत: ऊसतोडणी कामगाराची कमतरता दूर करण्यासाठी हार्वेस्टरचा मोठया प्रमाणात ऊसतोडणीसाठी केलेला वापराची योजना अनुकरणीय असल्याचे गौरोवोद्गार काढले. यावेळी कारखान्याचे व्हाईस चेअरमन रवींद्र काळे व कार्यकारी संचालक संजीव देसाई खातेप्रमुख, विभागप्रमुख व कामगार उपस्थित होते.