सोलापूर : विशेष स्वच्छता मोहिमे अंतर्गत महापालिका अतिक्रमण प्रतिबंधक विभागाच्या वतीने शहरातील ४ ठिकाणच्या रस्त्यावरील फूटपाथ वरील अतिक्रमण हटविण्यात आले. कारवाईमुळे रस्ता प्रशस्त झाला. येथील रस्त्याने मोकळा श्वास घेतल्याचे चित्र पाहायला मिळाले. या मोहिमेत लोखंडी खोक्यांसह इतर साहित्य जप्त करण्यात आले.
महापालिका आयुक्त शितल तेली उगले यांच्या आदेशानुसार उपायुक्त तैमूर मुलाणी आणि सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर शहरात रस्त्यावर तसेच फुटपाथवर रहदारीस अडथळा ठरणारे अतिक्रमण काढण्याची मोहीम राबविण्यात येत आहे. सोलापूर महापालिकेच्या वतीने दि. २ ते१३ डिसेंबर दरम्यान विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे. या अंतर्गत रस्ते, फुटपाथ तसेच दुभाजकाची नेटक्या पद्धतीने स्वच्छता करण्यात येत आहे
रस्त्यावरील तसेच फुटपाथवरील अतिक्रम गही काढण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत आज सकाळच्या सत्रात डफरीन चौक ते डी. आर.एम ऑफिस तसेच सात रस्ता ते विजापूर नाका रस्त्यावरील व फुटपाथ वरील अतिक्रमण काढण्यात आले.या कारवाईत ६ लोखंडी खोके व इतर साहित्य जप्त करण्यात आले. तर दुपारच्या सत्रात सात रस्ता परिसरातील अतिक्रमण काढण्यात आले.यावेळी तीनशे नारळ, हार व इतर साहित्य जप्त करण्यात आले. पोलिस बंदोबस्तात जेसीबीच्या सहाय्याने ही करवाई करण्यात आली. या मोहिमेत महापालिका अतिक्रमण प्रतिबंधक विभागाचे प्रमुख हेमंतकुमार डोंगरे, मुर्तुजा शहापुरे, सुफियान पठाण आदीसह पोलीस कर्मचारी उपस्थित होते.
सोलापूर शहरातील नागरिक व व्यापाऱ्यांनी रस्त्यावर तसेच फुटपाथवर अतिक्रमण करू नये. अतिक्रमण आढळून आल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा अतिक्रमण प्रतिबंधक विभागाचे प्रमुख हेमंतकुमार डोंगरे यांनी दिला आहे.