कोल्हापूर : प्रतिनिधी
जिल्ह्यातील चिमगाव इथल्या सख्ख्या बहीण-भावाचा काल सायंकाळी विषबाधेमुळे मृत्यू झाला आहे. श्रीयांश रणजित आंगज (वय वर्षे ५) आणि काव्या रणजित आंगज (वय वर्षे ८) अशी दोघांची नावे आहेत. कालपासून दोन्ही भावंडांना उलट्या आणि मळमळ असा त्रास जाणवत होता. मुरगुड आणि कोल्हापूर इथल्या खासगी दवाखान्यात त्यांच्यावर उपचार करण्यात आले. पण त्यांनी उपचाराला योग्य प्रतिसाद दिला नसल्याने दोघांचीही प्राणज्योत मालवली. या घटनेची नोंद कोल्हापूर सीपीआर चौकीत झाली असून या दोघांना अन्नातून विषबाधा झाल्याचा प्राथमिक अंदाज डॉक्टरांनी व्यक्त केला आहे.
या घटनेबाबत पोलिसांनी अशी माहिती दिली की, चिमगाव कागल येथील रणजित आंगज, पत्नी व दोन मुलांसमवेत राहत होते. चिमगाव येथील रणजित नेताजी आंगज यांच्या घरी नातेवाईकांनी मुलांना खाण्यासाठी कप केक आणला होता. हा केक रणजित यांच्या मुलांनी खाल्ला. दोन दिवसांपासून त्यांचा लहान मुलगा श्रीयांश आणि मुलगी काव्या यांना उलट्या आणि मळमळ असा त्राय व्हायला लागला. श्रीयांश याला मुरगूडमधील खासगी दवाखान्यात आणले. डॉक्टरांनी मुलाला तपासले आणि मुलाचा मृत्यू झाल्याचे सांगितले.
चिमगाव येथे त्या मुलावर अन्त्यसंस्कार करण्यात आले. त्यानंतर मुलगी काव्याला देखील त्रास जाणवू लागला. तिला सुद्धा सायंकाळी मुरगूड येथील दवाखान्यात दाखल करण्यात आले. पण ती उपचारांना प्रतिसाद देत नव्हती, त्यामुळे तिला कोल्हापूर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्या रुग्णालयात देखील तिची प्रकृती खालावत गेली आणि तिचा मृत्यू झाला.