बुलडाणा : प्रतिनिधी
महाराष्ट्रावर ‘एचएमपीव्ही’चे सावट घोंघावत असताना, बुलडाण्यात टक्कल व्हायरसने शिरकाव केला आहे. नागरिकांचे केस अचानक मोठ्या प्रमाणावर गळून टक्कल पडू लागल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या विचित्र आजारामुळे नागरिक त्रस्त असून, नेमके कशामुळे टक्कल पडू लागलंय, याबाबत नवीन माहिती समोर आली आहे.
बुलडाण्यातील केस गळतीच्या प्रकरणातील पाण्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. हे पाणी वापरणे किंवा पिण्यायोग्य नाही, याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी अमोल गिते यांनी दिली आहे.
बुलडाण्यातील बोंडगाव आणि खातखेडमध्ये ७० हून अधिक नागरिकांचे केस अचानक गळू लागले होते, आणि त्याला कारणीभूत ठरले आहे पाणी. पाण्यात नायट्रेटचे प्रमाण जास्त आहे. सामान्यत: पाण्यात नायट्रेटचे प्रमाण १० टक्क्यांपर्यंत असायला हवे. मात्र, पाण्याची तपासणी केली असता, त्यात ५४ टक्के नायट्रेटचे प्रमाण अधिक असल्याचे आढळून आले आहे.
पाण्यात नायट्रेटसारखा अत्यंत विषारी घटक मोठ्या प्रमाणात आढळून आले आहे. तसेच पाण्याची टीडीएस लेव्हलही भयंकर वाढली आहे. त्यामुळे पाणी विषारी बनल्याची माहिती आहे. तसेच पाण्यात क्षाराचे प्रमाण ११० पर्यंत असायला हवे होते. मात्र तपासणी केली असता, त्या पाण्यात क्षाराचे प्रमाण २१०० पर्यंत आढळून आले आहे. तसेच हे पाणी आता आर्सेनिक आणि लीड तपासणीसाठी, पुणे प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहे.
गावक-यांसाठी हे पाणी वापरणे आता विष ठरत आहे. या गावात पिण्याच्या पाण्याची वेगळी सोय करण्यात आली आहे. मात्र, वापरण्याच्या पाण्यात नायट्रेटसारखा विषारी घटक मोठ्या प्रमाणात आढळल्याने हे पाणी वापरण्यायोग्य नसल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. ज्यामुळे मोठ्या प्रमाणात नागरिकांचे केस गळू लागले होते.