उदगीर : प्रतिनिधी
जगण्यातल्या विसंगतीकडे वेगळी नजर करून पाहिल्यास जगणे सुस होते असे प्रतिपादन प्रसिद्ध साहित्यीक व महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे सदस्य धनंजय गुडसूरकर यांनी केले. पन्नास वर्षांपूर्वी शामलाल विद्यालयातून दहावी उत्तीर्ण झालेल्या तत्कालीन विद्यार्थ्यांच्या स्रेहमेळाव्यात ते बोलत होते . उदगीर येथील नामांकित असलेल्या श्यामलाल विद्यालयातून १९७४ साली दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा स्रेहमेळावा मागच्या पंधरा वर्षापासून आयोजित केला जातो. यावर्षी सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त स्रेहमेळाव्यात धनंजय गुडसूरकर यांचे ‘आनंदाचे जगणे ‘ या विषयावर व्याख्यान झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विभागीय परीक्षा मंडळाचे अध्यक्ष सुधाकर तेलंग होते. मंचावर निता मोरे, के. आर. शिंदे, रामभाऊ बिरादार यांच्यासह त्यावेळचे शिक्षकवृंद उपस्थित होते .
जगणे सुंदर होणे हे जगण्याकडे पाहण्याच्या दृष्टीकोनाचा भाग आहे. विश्वास व शंका या दोन बाबी परस्परविरोधी असल्या तरी त्यांचा योग्य वापर जगण्यात चव आणतो असे मत गुडसूरकर यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला. जगणे सुंदर करण्यासाठी चांगले छंद जपावे लागतात .जगण्याच्या पंचसूत्रीचा वापर करून जो जगतो त्याचे जगणे आनंदी होते, असे प्रतिपादन विभागीय एसएससी बोर्डाचे अध्यक्ष सुधाकर तेलंग यांनी अध्यक्षीय समारोपात बोलताना केले.
निवृत्त गटशिक्षणाधिकारी के. आर. शिंदे यांनी प्रास्ताविक केले. जीवनाचा झरा खळाळता ठेवण्यासाठी शारीरिक तंदुरुस्तीसह पाच गुणांना स्वीकारणे गरजेचे आहे, ते म्हणाले. नीता मोरे यांनी त्यांनी बालपणीचा काळ सुखाचा असल्याचे सांगितले. सुधाकर पोलावार, अंकुश मिरगुडे, पप्पू पांढरे, सोमनाथ बिरादार, डॉ. विश्वनाथ बिरादार यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष भगवानराव पाटील, केशवराव धोंडगे, बालाजी मुंढे, दिपाली शिंदे, डी . एन . केंद्रे यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले. आयोजक के.आर. शिंदे यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.