30.7 C
Latur
Thursday, April 24, 2025
Homeराष्ट्रीयवीर पत्नी हिमांशीचा लेफ्टनंट पतीला अखेरचा सॅल्यूट

वीर पत्नी हिमांशीचा लेफ्टनंट पतीला अखेरचा सॅल्यूट

 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भ्याड अतिरेकी हल्ल्यात आयबी, नेव्ही आणि एअरफोर्सच्या तीन अधिका-यांचा मृत्यू झाला. यामध्ये भारतीय नौदलाचे लेफ्टनंट विनय नरवाल यांचा समावेश आहे. नरवाल यांचे ७ दिवसांपूर्वीच लग्न झाले होते. ते पत्नीला घेऊन पहलगाम येथे गेले असता तेथे नववधूच्या डोळ््यादेखत विनय नरवाल यांच्यावर अतिरेक्यांनी बेछूट गोळीबार केला. यात अवघ्या ७ दिवसांत आपला पती गमावण्याची धक्कादायक वेळ पत्नीवर आली. अशाही स्थितीत आज जेव्हा नौदलाने विनयला मानवंदना दिली, त्यावेळी पत्नी हिमांशीने आय एम प्राऊड ऑफ यू विनय, इव्हरीटाईम जय हिंद… असे म्हणत तिने अश्रूंना वाट मोकळी केली. यावेळी पतीच्या मृतदेहासमोर ७ दिवसांच्या विधवेने टाहो फोडल्यानंतर उपस्थितांच्या डोळ््यांतही अश्रू तरळले.

पहलगाम येथे झालेल्या दहशतवाद्यांच्या हल्ल्यात आयबी, नेव्ही आणि एअरफोर्सच्या तीन अधिका-यांचा मृत्यू झाला. यात नेव्हीतील लेफ्टनंट विनय नरवाल यांचा समावेश असून, त्यांचे नुकतेच लग्न झाल्याने ते काश्मिरात फिरायला गेले होते. ते मंगळवारी पत्नीसमवेत पहलगाममध्ये असताना अतिरेक्यांनी पती विनय नरवाल यांच्यावर बेछूट गोळीबार केला. यात विनयला वीरगती प्राप्त झाली. त्यावेळी सहजीवनाची सुरुवात करताना मोठ-मोठी स्वप्ने पाहणा-या पत्नी हिमांशीचे सर्व स्वप्ने क्षणात धुळीस मिळाली. डोळ््यादेखत अतिरेकी हल्ल्यात पतीला गमावण्याची वेळ आल्याने तिच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला. ती पतीच्या मृतदेहाजवळ अक्षरश: हतबल होऊन बसली. सर्वांत मोठ्या धक्क्यातून सावरणे तिच्यासाठी कठीण होते. परंतु तिथे सर्वच पर्यटक दहशतीखाली होते. त्यामुळे ती स्तब्ध होती.

दरम्यान, आज पती विनय नरवाल यांचा मृतदेह दिल्लीत आणल्यानंतर जेव्हा नौदलाकडून मानवंदना देण्यात आली, त्यावेळी पत्नी हिमांशीने जय हिंद म्हणत पतीला श्रद्धांजली वाहिली. तो व्हीडीओ व्हायरला झाला असून, हा व्हीडीओ पाहताना अनेकांच्या पोटात कालवले. हरियाणातील करनाल जिल्ह्याचे मूळ रहिवाशी असलेले विनय नरवाल २ वर्षांपूर्वीच नौदलात भरती झाले होते. त्यानंतर ७ दिवसांपूर्वी म्हणजे १६ एप्रिल रोजी मोठ्या थाटामाटात लग्न सोहळा पार पडला. त्यानंतर फिरायला म्हणून ते पहलगामला गेले. त्याचवेळी अतिरेक्यांच्या हल्ल्यात विनयला जीव गमवावा लागला.

स्वीत्झर्लंडऐवजी गेले काश्मीरला
विनयच्या आजोबांनी पत्रकारांशी बोलताना विनय पत्नीसोबत स्वित्झर्लंडला जाणार होता. पण व्हिजा न मिळाल्याने काश्मीरला फिरायला गेला आणि तेथे अतिरेक्यांनी त्याचा घात केला, असे म्हटले.

भेळपुरी खाताना गोळीबार
विनय नरवाल आणि त्यांची पत्नी हिमांशी हनिमूनसाठी फिरायला गेले होते. काश्मीरमधील पहलागाम येथे हे नवदाम्पत्य भेळपुरी खात असताना अतिरेक्यांनी विनय नरवाल यांना गोळ््या घातल्या. त्यामध्ये विनय यांचा जागीच मृत्यू झाला. त्यावेळी आपल्या मृत पतीच्या पार्थिवाजवळ बसून नवविवाहिता हिमांशी टाफो फोडत होती. हिमांशीचा व्हिडिओ आणि तिचा पतीच्या पार्थिवाजवळ बसलेला फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला. अवघ्या ७ दिवसांपूर्वीचा आनंद दु:खाच्या शोकसागरात बुडाला.

 

 

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR