परभणी : शांतीनिकेतन विद्यालय येथे सामाजिक वनीकरण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने नुकताच जागतिक वन दिन हा वृक्षदिंडी आणि वृक्षारोपण कार्यक्रम घेऊन साजरा करण्यात आला.
या वेळी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, सामाजिक वनीकरण विभागाचे विभागीय वनाधिकारी एम. के. गोखले, सहा. वनसंरक्षक श्रीमती सायमा पठाण, सारंगस्वामी शिक्षण प्रसारक मंडळाचे सरचिटणीस धन्यकुमार शिवणकर, कार्याध्यक्ष दगडय्या मुदगलकर, चिटणीस शंकर मठपती, संचालक जनार्धन खाकरे, मनोज सावरगांवकर, अॅड. सुनील सावरगांवकर आदी मान्यवारांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून वृक्ष दिंडीला सुरवात केली. तसेच वृक्षारोपण ही करण्यात आले. या वेळी शांतीनिकेतन मा. विद्यालयाचे मुख्याध्यापक व्ही. एन. येस्के, शांतीनिकेतन प्रा. विद्यालयाच्या मुख्याध्यापिका जी. बी. धुळे, सारंगस्वामी मा. विद्यालयाचे प्र. मुख्याध्यापक एन. व्ही. निलंगे आदींची उपस्थिती होती.
यावेळी विद्यार्थ्यांना वृक्ष आणि वनाचे संरक्षण, संवर्धन करण्याबाबत माहिती देण्यात आली. होळी किंवा अन्य कारणासाठी जिंवत वृक्ष तोडू नयेत, तसेच पावसाळ्यापूर्वी वृक्ष लागवड करणे गरजेचे असून वृक्ष लागवड ही जास्तीत जास्त करावी, असे आवाहन विद्यार्थ्यांना करण्यात आले. वृषदिंडी नंतर विद्यार्थ्यांनी शाळेबरोबरच परिसरातील मंदिर आदी भागात वृक्षारोपण केले. या प्रसंगी मंदिराचे ट्रस्टी कोठेवाड, परिसरातील महिला भजनी मंडळ आणि नारायणराव नेमाने आदी नागरिक व पालकांनी कार्यक्रमात सहभाग घेतला.
या कार्यक्रमाला वनपरिक्षेत्र अधिकारी आर. एस. देवकते, वनपाल अर्चना चंद्रमोरे आदी वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांच्यासह शांतिनिकेतन विद्यालयाचे सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी वृंद उपस्थित होते.