लातूर : प्रतिनिधी
राजर्षी शाहू महाराज मान्यवर वृध्द साहित्यीक व कलावंत योजनेतंर्गत गेल्या तीन वर्षात जिल्हाभरातील वृध्द साहित्यीक, कलावंतांनी निवडीसाठी अर्ज केले. सदर अर्जांची छानणी होईपर्यत दुसरी समिती जाहिर झाली. वृध्द कलावंतांच्या निवडीचा विषय ना जुन्या समितीला, ना नव्या समितीने मार्गी लावला. त्यामुळे वृध्द साहित्यीक, कलावंतांच्या निवडीची नुसती टोलवा टोलवी होत असलयाचे चित्र पाहावयास मिळत आहे. सध्या सगळीकडे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा बोलबाला आहे. वृध्द कलावंत तीन वर्षांपासून निवडीच्या प्रतिक्षेत आहेत. वृध्द कलावंत ‘लाडके’ नाहीत का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
राजर्षी शाहू महाराज मान्यवर वृध्द साहित्यीक व कलावंत योजनेतंर्गत कलावंत निवडीसाठी २१ जुलै २०२३ रोजी जिल्हा वृध्द साहित्यिक व कलावंत मानधन योजना निवड (अशासकीय) समिती निवडण्यात आली. २०२१-२२, २०२२-२३, २०२३-२४ या तीन वर्षाच्या कालावधीतील निवड प्रक्रीया रखडल्याने जिल्हयातील अनेक साहित्यीक व कलावंतांकडून अर्ज मागवून घेण्यात आले. सदर अर्जाची छाननी होऊन जवळपास १ हजार ३५० अर्ज वैध ठरवण्यात आले. सदर अर्जांच्या संदर्भाने वृध्द साहित्यीक व कलावंतांची निवडसाठीची प्रक्रिया लवकर होणे आपेक्षित होते. अशासकीय समितीची निवड होऊन वर्ष उलटले तरीही, निवड प्रक्रीया झाली नाही. १६ मार्च रोजी शासनाने जिल्हाधिकारी वृध्द साहित्यक व कलावंत निवडीच्या अध्यक्षा असणार असे नविन आदेश काढले. त्यामुळे पहिल्या समितीच्यापुढे निवडीचा पेच निर्माण झाला.