अहमदपूर : प्रतिनिधी
तालुक्यातील हडोळती येथील वयोवृद्ध दांपत्य अंबादास पवार या शेतक-याने शेती मशागतीसाठी लागणारा खर्च परवडत नाही म्हणून स्वत:ला शेती मशागतीसाठी बैलासारखे जुंपल्याचे वृत्त वृत्तपत्रात प्रकाशित झाले आणि प्रकाशित बातमीची दखल महाराष्ट्रातील सर्व इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि प्रिंट मीडिया यांनी घेतली. यांची सर्व समाज माध्यमांमध्यामतून याची संपूर्ण देशभर चर्चा झाली आहे. ही घटना समाज माध्यमांमध्ये कुतूहलाचा विषय ठरला.
सध्या सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनामध्ये विरोधी पक्ष नेत्यांनी तर सरकार व प्रशासनाला धारेवर धरले या सर्व बातमीची दखल घेऊन अभिनेता सोनू सूद व अनेक राजकीय मंडळी सेवाभावी संस्था शेतकरी संघटना व सामाजिक संघटना यांनी घेतली व त्या वृद्ध शेतकरी दांपत्यास सहानुभूतीने सर्व सामाजिक माध्यमातून देणगी भेटू लागली आहे. महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री मधुकर कोकाटे यांच्या संपर्कानंतरही प्रशासनाकडून या वृद्ध दांपत्यास जी मदत केली गेली ती अत्यंत तोकडी करण्यात आली आहे. तदनंतर या सर्व बातमीची दखल प्रिंट मीडियाद्वारे व इलेक्ट्रॉनिक मीडियाद्वारे तेलंगणा राज्यातील सक्रिय असणारी रघु अरीकापुडी सेवा ट्रस्ट या सामाजिक संस्थेने घेऊन त्या शेतक-याला शोधत हडोळतीपर्यंत पोहोचून त्यांनी त्या शेतकरी वृद्ध दांपत्यास तब्बल एक लाख रुपयांचा धनादेश शेती अवजारे व शेती मशागतीसाठी लागणा-या साहित्य खरेदीसाठी सपूर्त केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) लातूर यांच्याकडून या शेतक-याला सहकारी बँकेतील असलेले ४० हजार रुपयांचे कर्ज भरण्यासाठी रोख चाळीस हजार रुपये दिग्वजिय पाटील याच्याकडून सुपूर्त करण्यात आले व मुंबई येथील माजी कर्नल विलास डांगे यांचेकडून रोख दहा हजार रुपयांची मदत मिळाली आहे.