लातूर : प्रतिनिधी
वैद्यकीय क्षेत्रात फिजिओथेरपी ही शाखा अतिशय महत्वाची असून या शाखेची गरज दिवसेंदिवस वाढत आहे. करिअरच्या दृष्टीकोणातून ही शाखा तरुणांसाठी फायद्याची ठरत आहे. वैद्यकीय क्षेत्रातील इतर शाखांप्रमाणेच फिजिओथेरपी ही आरोग्य सेवेचा अविभाज्य घटक आहे, असे मत महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे परिक्षा नियंत्रक डॉ. संदीप कडू यांनी व्यक्त केले.
एमआयपी फिजिओथेरपी महाविद्यालयात आयोजित १७ व्या बीपीटीएच पदवी व एमपीटीएच पदव्युत्तर पदवी समारोप समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. संदीप कडू बोलत होते. यावेळी विवेकानंद रुग्णालय व संशोधन केंद्रातील फिजिओथेरपी विभाग प्रमुख डॉ. हर्षा मंत्री, कार्यकारी संचालक प्रा. तेजस कराड, प्राचार्य डॉ. सुभाष खत्री यांची प्रमुख उपस्थिती होती. बीपीटीएच पदवी व एमपीटीएच पदव्युत्तर पदवी प्राप्त करणा-या विद्यार्थ्यांवर भविष्यात आरोग्य सेवेची मोठी जबाबदारी आहे. रुग्णांवर उपचार करताना नियमांचे पालन आणि आपलेपणाची भावना राखणे गरजेचे असल्याचे सांगून डॉ. कडू म्हणाले की, पदवी मिळाल्यानंतर शिक्षण संपत नाही; तर पुढे नव्या शिक्षणाची सुरुवात असते. विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीच्या विषयात पदव्युत्तर शिक्षण घेऊन संशोधन, शिक्षण आणि आरोग्य सेवेत योगदान द्यावे. जिवनात यशस्वी होण्यासाठी विद्यार्थ्यांनी स्वयंशिस्त, वेळेचे नियोजन आणि दिनचर्येत समतोल राखावा.
यावेळी डॉ. मंत्री म्हणाल्या की, फिजिओथेरपी पदवीधरांनी विविध आजारांचे स्वरूप लक्षात घेऊन वेगवेगळ्या शाखांमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेणे आवश्यक आहे. सामाजिक बांधिलकी लक्षात घेऊन रुग्णसेवा करणे हे प्रत्येक फिजिओथेरपिस्टचे कर्तव्य असल्याचे त्यांनी सांगीतले. यावेळी प्रा. कराड म्हणाले की, प्रत्येकाने प्रामाणिकपणे सेवा देत नव शिक्षण व संशोधनावर भर द्यावा. तसेच प्राचार्य डॉ. खत्री म्हणाले की, विद्यार्थ्यांनी बीपीटीएच अभ्यासक्रमात आत्मसात केलेले ज्ञान रुग्णसेवेसाठी उपयोगात आणावे. देश-विदेशात फिजिओथेरपिस्टची मोठी मागणी असून अत्याधुनिक तंत्रज्ञान व ज्ञान आत्मसात करणे आवश्यक आहे.
यावेळी बीपीटीएच पदवीची विद्यार्थीनी इशा पाटील, दिव्या जगताप व पालक सत्यनारायण गुर्रम यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी चारही वर्षात विशेष गुवत्तेने उत्तीर्ण झाल्याबद्द्ल पदवीधर विद्यार्थीनी आकांक्षा गट्टाणी व पदव्युत्तर विद्यार्थीनी डॉ. अभिलाषा मुंदडा यांना श्रीमती उर्मिलादेवी कराड या पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. या समारंभात मान्यवरांच्या हस्ते ४५ पदवीधर व ११ पद्व्युत्तर विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले. प्रारंभी डॉ. झिशान महमंद यांनी विद्यार्थ्यांना आरोग्य सेवेची शपथ दिली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विशाखा सुरवसे व विशाखा गाडेकर यांनी केले तर डॉ. रिशा कांबळे यांनी आभार मानले. पदवीदान समारंभास डॉ. आर. एम. सिंगरावेल्लन, डॉ. गौरव भटनागर, डॉ. विश्वनाथ पावडशेट्टी, डॉ. संगीता सिंगरावेल्लन, डॉ. शितल घुले, डॉ. श्रुती ताडमारे, डॉ. काजल चौहान, डॉ. पवन कुमार, डॉ. प्रमोद गायसमुद्रे, डॉ. अनिल साठे, डॉ. सलीम शेख, डॉ. स्मिता मुंडे, डॉ. प्रतिक्षा लंके आदी उपस्थित होते.