25.3 C
Latur
Thursday, June 27, 2024
Homeलातूरवैद्यकीय महाविद्यालयावरील रुग्ण सेवेचा भार होणार कमी 

वैद्यकीय महाविद्यालयावरील रुग्ण सेवेचा भार होणार कमी 

लातूर : प्रतिनिधी
महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने जागेची किंमत म्हणून लातूर कृषी महाविद्यालयास ३ कोटी ३२ लाख ६८ हजार रुपये वर्ग करण्यास मंजुरी दिली असल्यामुळे लातूर येथील जिल्हा  रुग्णालय उभारणीचा मार्ग मोकळा झाला आहे. येत्या काळात जिल्हा रुग्णालय रुग्णसेवेत रुजू होणार असल्यामुळे येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयावरील रुग्णसेवेचा भार कमी होणार आहे. परिणामी भावी डॉक्टरांना शिक्षणावर जास्त वेळ देता येणार आहे.
लातूरच्या जिल्हा सामान्य रुग्णालयातच १२ वर्षांपुर्वी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची स्थापना झाली. त्यावेळेपासून जिल्हा रुग्णालयाच्या जागेचा प्रश्न या ना त्य कारणाने सुटू शकला नव्हता. काही वर्षांपुर्वी शासनाने शहरातील कृषी महाविद्यालयाची १० एकर जागा जिल्हा सामान्य रुग्णालयासाठी मंजूर केली होती. पण त्याचे ३ कोटी ३२ लाख ६८ हजार रुपये आरोग्य विभागाला दिले तर ही जागा हस्तांतरण होणार होती. परंतू, ते होता होत नव्हते. शेवटी दि. १९ जून रोजी महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने जागेची किंमत म्हणून लातूर कृषी महाविद्यालयास ३ कोटी ३२ लाख ६८ हजार रुपये वर्ग करण्यास मंजुरी दिली असल्यामुळे लातूर येथील जिल्हा  रुग्णालय उभारणीचा मार्ग मोकळा झाला.
माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी लातूर व परिसरातील नागरिकांना चांगल्या आरोग्य सोयी सुविधा मिळाव्यात, वैद्यकीय क्षेत्रात जाणा-या लातूरच्या विद्यार्थ्यांना शिक्षणाची सोय व्हावी म्हणून  लातूर येथे जिल्हा रुग्णालयाच्या ठिकाणी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजूर केले होते.  त्यानंतर त्यांच्याच कार्यकाळात लातूरसाठी स्वतंत्र जिल्हा रुग्णालयही मंजूर झाले, मात्र या रुग्णालयासाठी जागा उपलब्ध होत नसल्याने, या रुग्णालयाची उभारणी करण्यात अडचण निर्माण झाली होती.   माजी मंत्री  अमित विलासराव देशमुख यांनी यासंदर्भात पाठपुरावा करुन लातूरमधील कृषी  महाविद्यालयाची १० एकर जागा रुग्णालय उभारणीसाठी मंजूर करुन घेतली होती. या जागेचे पैसे देण्यास शासनाने मंजूरी दिल्याने आता जिल्हा सामान्य रुग्णालय उभारणीचा मार्ग मोकळा झाला आहे.
लातूरला जिल्हा सामान्य रुग्णालय नसल्याने सर्दी, खोकल्यापासूनचे सर्वच रुग्ण वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी येत आले. त्यामुळे दररोज बा रुग्ण विभागात दीड ते दोन हजार रुग्णांवर उपचार केले जात आहेत. किरकोळ अपघातापासून ते मोठ्या अपघातातील रुग्णांची संख्या मोठी आहे. या महाविद्यालयाला५०० खाटांची मंजूरी आहे. त्यानूसार कर्मचारी वर्ग आहे. परंतू, सध्या ७०० खाटांचा वापर करुन उपचार केले जात आहेत. महिला प्रसुतीगृहात तर फलोअरबेडचा वापर करावा लागत आहे. एवढेच नव्हे तर जिल्हा सामान्य रुग्णालयाची सर्वच कामे या महाविद्यालयाला करावी लागत आहेत. या कामातच महाविद्यालयाच्या डॉक्टरांचा वेळ जात आहे. शिक्षण आणि संशोधन कमी करणारा हा प्रश्न आहे. जिल्हा सामान्य रुग्णालय झाले तर महाविद्यालयाचा भार कमी होणार आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR