बार्शी-वैराग नगरपंचायतीच्या क्षेत्रामधील बेकायदेशीर आणि अनाधिकृत केलेले अतिक्रमण काढण्यासाठी नगरपंचायतीने वेगवान हालचाली सुरू करीत हिंगणी रस्त्यावरील बेकायदेशीर अतिक्रमण काढण्या सुरुवात केली असून त्यामुळे अतिक्रमण केलेल्या व्यावसायिकांचे धाबे दणाणले असून कारवाई टाळण्यासाठी नेतेमंडळींना साकडे घालू लागले आहेत.
वैराग ग्रामपंचायतची नगरपंचायत झाली मात्र बेकायदेशीर आणि अनाधिकृत केलेले अतिक्रमण तसेच राहिले. या अतिक्रमणाबाबत गेल्या अनेक वर्षांपासून न्यायालयीन प्रक्रिया आणि वारंवार तक्रारी होत राहिल्या आहेत. या तक्रारींची दखल घेऊन दस्तुरखुद जिल्हाधिकाऱ्यांनी दोन वेळा अतिक्रमण काढण्याबाबतच्या नोटिसा वैराग नगरपंचायतीस बजावल्या होत्या. तरी देखील वैराग नगरपंचायतीने अनाधिकृत आणि बेकायदेशीर अतिक्रमण
काढण्याच्या निर्णयाकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. रस्त्यावरील अतिक्रमण आणि बेशिस्त वाहुतकीमुळे वैदयकीय शिक्षण घेणाऱ्या १९ वर्षीय ऋतुजाचा अपघातामध्ये बळी गेला आहे यामुळे
वैराग करामध्ये संतप्त भावना निर्माण झाली असून नगरपंचायतीचे अधिकारी पदाधिकारी यांना लोकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे याची दखल घेत नगरपंचायतीने अनाधिकृत अतिक्रमणे
काढण्यास सुरुवात केली आहे. बार्शी सोलापूर रस्त्यावरील मुख्य शहर आणि ५७ गावांची वैराग बाजारपेठ प्रसिद्ध आहे. माढा, धाराशिव, तुळजापूर, मोहोळ या तालुक्यांना जोडणारे मध्यवर्ती ठिकाण वैराग बनले आहे. त्यामुळे ग्रामस्थांची म ोठी रेलचेल वैराग मध्ये असते. वाहनांची वाढती संख्या लक्षात घेता अनाधिकृतपणे वाढलेल्या अतिक्रमणामुळे अपघातांची संख्या वाढली आहे. व्यवसायिकांनी प्रमाणापेक्षा अधिक अतिक्रमण केल्यामुळे वाहतुकीस अडथळा आणि वारंवार तंटे होण्याचे प्रकार घडले आहेत.
अतिक्रमण मोहीम कारवाई सर्वसमावेशक व्हावी, वैराग नगरपंचायतीच्या प्रत्येक हद्दीतील प्रत्येक ठिकाणचे अनाधिकृत अतिक्रमण निघावे. आणि या मोहिमेमध्ये कोणताही राजकीय हस्तक्षेप होऊ नये असे सर्वसामान्यांचे म्हणणे आहे. नगरपंचायतीच्या सोबत वैराग बार्शी, वैराग-माढा या रस्त्यावरील देखील अतिक्रमण काढून रस्त्याचा श्वास रिकामा करावा अशीही मागणी प्रवाशांकडून होत आहे.
बार्शी तालुका सार्वजनिक बांधकाम विभागाकडून बार्शी-सोलापूर रस्ता तसेच माढा रस्त्यावरील झालेले अतिक्रमण काढणे गरजेचे असताना देखील त्याला संबंधीत विभागाकडून जाणून बुजून टाळाटाळ केली जात असल्याची चर्चा लोकामध्ये होत आहे.
अतिक्रमण काढण्याबाबत यापूर्वी विविध माध्यमातून जनजागृती करण्यात आली आहे. सर्व अतिक्रमणधारकांनी स्वतःहुन अतिक्रमण काढून घ्यावे. असे आवाहन नगर पंचायत वैरागच्या मुख्य कार्यकारी अधिकारी चरण कोल्हे यांनी केले आहे.