उपमुख्यमंत्री अजित पवारांची ग्वाही, मुख्यमंत्र्यांचाही फोन
पुणे : प्रतिनिधी
राज्याचे उपमुख्यमंत्री आणि वैष्णवी हगवणे हिच्या लग्नात ज्यांच्या हाताने हगवणे कुटुंबीयांना फॉर्च्युनरची चावी देण्यात आली होती त्या अजित पवारांनी वैष्णवीच्या माहेरी जाऊन कुटुंबीयांचे सांत्वन केले. आई-वडिलांची भेट घेत संपूर्ण घटना जाणून घेतली. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना तपासाबाबत माहिती दिली आणि हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालेल, याचा लवकरच निकाल लागेल, असे म्हटले. तसेच वैष्णवीचे मामासासरे असलेल्या पोलिस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर यांनाही अजित पवारांनी स्पष्ट शब्दात इशारा दिला. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट मोबाईलवरून वैष्णवीच्या आई-वडिलांशी संवाद साधला.
आज सकाळी महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी कस्पटे कुटुंबीयांची भेट घेतल्यानंतर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वैष्णवीच्या आई-वडिलांची भेट घेऊन सांत्वन केले. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना, याप्रकरणी कोणाचीही हयगय केली जाणार नाही, राजकीय हस्तक्षेप होणार नाही, असे अजित पवारांनी म्हटले. आरोपींना तातडीनं बेड्या ठोकण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार तिघांना आधीच अटक केली होती, सासरे आणि दिराला आज बेड्या ठोकल्या. तपास करणा-या सर्वांना इथेच बोलावले. तसेच बाळ ज्यांच्याकडे होते, त्या निलेश चव्हाणवरही कडक कारवाईचे आदेश दिले आहेत, अशी माहिती अजित पवारांनी दिली.
दरम्यान, भाजप नेते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू गिरीश महाजन यांनी आज वैष्णवीच्या आई-वडिलांची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी व्हीडीओ कॉलद्वारे मुख्यमंत्र्यांशी संवाद साधून दिला. त्यावेळी वैष्णवीच्या वडिलांनी या प्रकरणी आरोपींवर मोक्का लावा आणि विशेष सरकारी वकील म्हणून राजेश कावेडिया यांची नेमणूक करण्याची मागणी केली. कावेडिया यांची नेमणूक करण्याचे मुख्यमंत्र्यांनी तातडीने मान्य केले.
हगवणे पिता-पुत्राला
२८ मेपर्यंत कोठडी
पुणे : प्रतिनिधी
जिल्ह्यातील वैष्णवी हगवणे हुंडाबळी आणि छळ प्रकरणावरून राज्यभर संतापाची लाट उसळली आहे. त्यातच अजित पवारांनी काल पोलिसांना आदेश दिल्यानंतर आज फरार राजेंद्र हगवणे आणि त्यांच्या मुलाला पहाटेच्या सुमारास अटक करण्यात आली. त्यानंतर दोघांनाही शिवाजीनगर कोर्टात हजर करण्यात आले. त्यावेळी कोर्टाने हगवणे पिता-पुत्राला २८ मेपर्यंत म्हणजेच ५ दिवसांची कोठडी सुनावली आहे.