मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे पुण्यातील नेते राजेंद्र हगवणे यांची सून वैष्णवी हिने आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. सासरच्या जाचाला कंटाळून वैष्णवी हिने आत्महत्या केली असून या प्रकरणी आता शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी लक्ष घातले आहे. त्यांनी वैष्णवीसाठी लढाई लढण्याचा निर्णय घेतला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) नेते राजेंद्र हगवणे यांची सून वैष्णवी शशांक (वय वर्षे २३) हिने शुक्रवारी (ता. १६ मे) राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. सुरुवातीला वैष्णवी नेमकी कोण आहे? याबाबतची कोणतीही माहिती समोर आली नव्हती. परंतु, घटनेच्या काही वेळातच सदर महिला ही अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते राजेंद्र हगवणे यांची सून असल्याची माहिती समोर आली.
ज्यानंतर राजकारणात खळबळ उडाली. वैष्णवी हिने तिच्या सासरच्या जाचाला कंटाळून आपल्या जीवनाचा शेवट केल्याची माहिती समोर आली आहे. ज्याप्रकरणी राजेंद्र हगवणे, सासू लता, नणंद करिश्मा, दीर सुशील आणि नवरा शशांक यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. परंतु, या प्रकरणात आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी लक्ष देण्यास सुरुवात केली आहे. कारण वैष्णवीसाठी हवी ती लढाई लढण्यास तयार आहे, असे सुळे यांनी म्हटले आहे.
राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मुंबई येथे प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना वैष्णवी हगवणे यांच्या आत्महत्येसंदर्भात प्रश्न विचारण्यात आला. याबाबत उत्तर देताना त्या म्हणाल्या की, मला आजही विश्वात बसत नाहीये की, पुरोगामी महाराष्ट्रात हुंड्यासाठी मुलीचा बळी घेतला जात आहे. या गोष्टी चित्रपटात होतात. पण आता हे महाराष्ट्रात होऊ लागले आहे. पण या प्रकरणात जे कोणी दोषी असतील, त्यांच्यावर कारवाई ही झालीच पाहिजे. कारण या घरातील दोन्ही सुनांसोबत या घटना घडल्या आहेत. या घरात त्या मुलीला झालेली मारहाण ही अमानुषपणाचा कळस गाठणारी होती आणि हा विषय माझ्या लोकसभा मतदारसंघात झाल्याने हे प्रकरण आणखी अस्वस्थ करणारे आहे, असे सुप्रिया सुळेंकडून सांगण्यात आले.
या प्रकरणाची बरीचशी माहिती पोलिसांकडून आणि मीडियाकडून आली आहे. तिच्या शरीरावरील मारहाणीचे व्रण हे या प्रकरणातील अमानुषपणा दाखवून देतात. पोलिसांनी या प्रकरणी काहींना अटक केली आहे. पण घरातला कर्ता पुरुष राजेंद्र हगवणे अद्यापही फरार आहेत. त्यामुळे ते फरार होऊ कसे शकतात? असा प्रश्न आहे. त्यामुळे त्या मुलीला या पुरोगामी विचाराच्या महाराष्ट्रात न्याय मिळालाच पाहिजे.