– गुलाबराव पाटील यांची माहिती
मुंबई : प्रतिनिधी
मराठवाड्यातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी खात्रीशीर व कायमस्वरुपी उपाययोजना म्हणून मराठवाड्यातील ११ मोठी धरणे पाईपलाईनद्वारे जोडून मराठवाड्यातील सर्व शहरे, गावांना पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी ‘मराठवाडा वॉटर ग्रीड’ योजना राबविण्यात येत आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून मराठवाड्याला शाश्वत पाणी उपलब्ध होणार असल्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले. प्रकल्पाच्या उभारणीसाठी जागतिक स्तरावरील बँकांचा सहभाग असणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
‘मराठवाडा वॉटर ग्रीड’ प्रकल्पाबाबत जागतिक स्तरावरील बँकांच्या प्रतिनिधींसमवेत मंत्रालयात आढावा बैठक घेण्यात आली. या वेळी पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव अभिषेक कृष्णा, ‘मित्रा’चे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीणसिंह परदेशी, जल जीवन मिशन अभियान संचालक इ. रवींद्रन, जलसंपदा विभागाचे सचिव संजय बेलसरे उपस्थित होते तसेच दूरदृश्य प्रणालीद्वारे अशियन इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँकेचे राजेश यादव, एशियन डेव्हलपमेंट बँकेचे विकास गोयल, न्यू डेव्हलपमेंट बँकचे बिंदू माधव पांडा, एन. रंगनाथ उपस्थित होते.
मराठवाड्यातील पाणीप्रश्नावर कायमस्वरुपी उपाययोजना करणे आवश्यक आहे. ‘मराठवाडा वॉटर ग्रीड’ प्रकल्पाच्या माध्यमातून मराठवाड्याला दीर्घकालीन स्वरुपात पाणी उपलब्ध होणार आहे तसेच केंद्र सरकारच्या सूचनेनुसार ‘मराठवाडा वॉटर ग्रीड’ प्रकल्पाची उभारणी राज्य शासनाने वर्ल्ड बँक, आशियायी विकास बँक यासारख्या बँकांमार्फत कर्ज स्वरुपात निधी उभारणी करून अंमलबजावणी करण्यात यावी, असे सूचित केले आहे. त्यानुसार ‘मित्रा’ संस्थेमार्फत अशा जागतिक संस्थांशी समन्वय साधून हा प्रकल्प पुढे नेण्यासाठी पाठपुरावा करण्यात यावा, असे गुलाबराव पाटील म्हणाले.