22.8 C
Latur
Thursday, December 12, 2024
Homeलातूरव्यवस्थेचा खरा चेहरा समोर आणण्याचा प्रयत्न 

व्यवस्थेचा खरा चेहरा समोर आणण्याचा प्रयत्न 

लातूर : एजाज शेख
महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ६३ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्यस्पर्धेची प्राथमिक फेरी लातूरच्या मार्केट यार्डातील स्व. दगडोजीराव देशमुख स्मृती सभागृहात बुधवारपासून सुरु झाली. गुरुवारी म्हणजेच स्पर्धेच्या दुस-या दिवशी लातूरच्या उन्नती फाऊंडेशनने विशाल बांदल लिखीत व गिरीश बिडवे दिग्दर्शित ‘आज महाराष्ट्र दीन आहे…’ या दोनअंकी नाटकाने अख्ख सभागृह खिळवून ठेवलं.
आईचं दूध प्यायलो की तिच्यातील सत्व आपल्यात येतात आणि ती आयुष्यभर राहतात. तसंच आपण ज्या राष्ट्रात राहतो तिथलं पाणी पितो त्याचे गुण आपल्यात सदैव राहतात. अशाच महाराष्ट्रावर प्रेम असणा-या आणि एका मोठ्या दहशतवादी हल्ल्याची झळ बसलेल्या एका सामान्य पत्रकाराची ही कथा आहे. केशव दामले त्याचं नाव. सर्व सामान्य माणूस त्याच्यावरच्या अन्यायावर दाद मागण्यासाठी सगळ्यात पहिली धाव घेतो ती पोलीस स्टेशन कडे ..तसंच केशव दामलेसुद्धा ३० एप्रिलच्या रात्री एका पोलीस स्थानकात त्याची तक्रार नोंदवायला जातो. तक्रार बलात्काराची आहे.
 मात्र हा बलात्कार महाराष्ट्रावर झालाय असा त्याचा दावा आहे.  त्याच्या त्या विधानावर वाद-प्रतिवाद होतात आणि समाजाचे रक्षक असलेलं आपलं पोलीस दल कसं राजकीय लोकांच्या हातातलं बाहुलं आहे, याचा प्रत्यय येतो. पोलीस दल त्यांची खदखद बोलून दाखवतात आणि केशव दामले सामान्य माणसांच्या अपेक्षांचा पाढा वाचतो. या दोन तासांच्या प्रवासात इथल्या व्यवस्थेचा खरा चेहरा जगासमोर येतो. पोलिसांची हतबलता. त्यांच्या समस्या, सामान्य माणसांच्या जबाबदा-या आणि त्यात राजकीय दबाव या सगळ्यातून महाराष्ट्र कसा दीन आहे, यावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न या नाटकातून केला गेला आहे.
महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने ६३ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्यस्पर्धेची प्राथमिक फेरी लातूरच्या मार्केट यार्डातील स्व. दगडोजीराव देशमुख स्मृती सभागृहात सुरु आहे. गुरुवारी ‘आज महाराष्ट्र दीन आहे…’ या दोनअंकी नाटकाचा प्रयोग झाला. पोलीस अधिका-याच्या भुमिकेत करकटे (राजकुमार राऊत) यांनी अभिनयाची चुनूक दाखविण्याचा प्रयत्न केला. धायगुडे (श्याम शिंदे), झेंडे (महेंद्र कांबळे), कदम (आकाश कळसे) यांनी पोलीस कर्मचा-याची भुमिका करताना त्या भुमिकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. परंतु, लक्षात राहिला तो केशव दामले (शिरीष तीर्थकर). एक सामान्य माणुस, पत्रकार म्हणून  शिरीषने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. ढेंगळे पाटील (सुवर्णा बुरांडे), राजेश हिंडे (महेश चिमले), विकास रोमांडे (अर्जुन वाघमोडे), वरुन (सुनील केंद्रे),  पट्टेबहादूर (राहूल जोशी), पी. ए. (प्रदीप चोपणे) यांनी आपापल्या भुमिका पार पाडल्या.
दिगदर्शक म्हणुन गिरीष बिडवे यांनी कसब पणाला लावले. परंतु, त्यांना आणखी खुप काही करता येण्यासारख्या जागा होत्या. कलावंतांचे पाठांतर नसल्याचे एक-दोन प्रसंगातून जाणवले. प्रदीप चोपणे यांचे नैपथ्य टीपटाप होते. नाटकात उत्तम सीन सुरु असताना अशोक घोलप यांच्या प्रकाश योजनेची गडबड होत होती. गायत्री तीर्थकर यांचे संगीत संयोजनही नाटकातील प्रसंगानुरुप जाणवले नाही. पंकज गोरे यांची वेशभूषा उत्तम होती. रंगभुषेला फारसा वाव नव्हताच परंतु, सत्यम सरदेसाई यांनी त्यांची जबाबदार पार पाडली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR