किनगाव : जाकेर कुरेशी
जागतिक पातळीवर बदलत चाललेले व्यापार धोरण त्यामुळे सर्वत्र येत असलेली आर्थिक मंदी त्यात लोकांचा वाढत चाललेला ऑनलाईन शॉपिंगचा छंद आणि प्रत्येक व्यवसायात झालेली पराकोटीची स्पर्धा यामुळे किनगाव शहरातील प्रमुख व अंतर्गत रस्त्यावरील काही शटर दुकाने किरायाविना रिकामेच असल्यामुळे त्या दुकानाच्या मालकामध्ये उदासीनता वाढीस लागली आहे. सद्यस्थितीत जागतिक पातळीवर प्रत्येक देशाचे व्यापार धोरण दिवसागणिक बदलत आहे व ते तात्काळ अॅण्ड्रॉईड फोनवर समजत असल्यामुळे त्याचे तीव्र पडसाद व्यापारिक क्षेत्रावर होत आहे. लगेच त्या क्षेत्रात अविश्वासाचे वातावरण निर्माण होऊन आर्थिक मंदीचे सावट दिवसागणिक काळेकुट्ट होत आहे.
बाजारपेठेतील प्रत्येक व्यवसायात पराकोटीची स्पर्धा वाढली आहे. या स्पर्धेमुळे चार-पाच वर्ष अगोदर प्रमुख रस्त्यावरील शटर दुकाने घेण्यासाठी स्पर्धा लागत होती. त्यामुळे आपोआपच दुकानाच्या मालकांना प्रतिवर्षी आपल्या दुकानाचे भाडे व अनामत रक्कम न मागता वाढून मिळत होती, ती आता परमोच्च सीमेवर गेली. त्यामुळे प्रत्येक व्यवसायात व्यावसायिकांना आपल्या नोकरचाकरांचा पगार, दुकाने सजावटीसाठी केलेली विद्युत रोषणाईचे अवाढव्य येत असलेले वीज बिल व व्यवसायात स्पर्धा झाल्यामुळे विभाजन झालेले ग्राहक यामुळे वर्षाकाठी शटर दुकानावर व विद्युत बिलावर होत असलेला खर्च निघत नसल्यामुळे अनेकांनी सर्व धंदे व्यवसाय बंद केल्यामुळे अनेक दुकाने शटर आज घडीला बंद अवस्थेत
आहेत.
कंपनी ते थेट त्यातल्या त्यात फ्लिपकार्ट, अमेझॉन वरील ऑनलाईन खरेदीचा छंद प्रत्येकाच्या घरात लागला आहे. त्यामुळे जी वस्तू पाहिजे ती ऑनलाईन शोधता ग्राहकांच्या हाती घरपोच येत असल्यामुळे तिची किंमतही कमी असते. यामुळेही ग्राहकांचा थेट दुकानातून खरेदी करण्याचा कल दिवसागणिक कमी होत आहे हे पण कारण मानल्या जात आहे. उपरोक्त पार्श्वभूमीवर किनगाव परिसरातील प्रमुख व अंतर्गत रस्त्यावरील जवळपास शटर दुकाने आज घडीला दीपावलीपासून बंद अवस्थेत असल्यामुळे त्या मालकांमध्ये मात्र अस्वस्थता पसरत आहे.