नाशिक : प्रतिनिधी
सर्वसामान्य भाविकांचा त्रास कमी व्हावा यासाठी शिर्डीच्या साई मंदिरात व्हीआयपींना पहाटेच दर्शन द्यावे. त्यासाठी साई संस्थानने तिरुपती बालाजी मंदिरातील दर्शन व्यवस्थेचा अभ्यास करावा अशी मागणी भाजपाचे माजी खासदार सुजय विखे यांनी केली आहे. शिर्डीच्या साई मंदिरात व्हीआयपी दर्शनामुळे अनेकदा दर्शन रांगा थांबवल्या जातात. त्यामुळे सर्वसामान्य भक्तांना नाहक मन:स्ताप सहन करावा लागतो.
साईबाबा संस्थानने तिरुपतीच्या धर्तीवर व्हीआयपींना पहाटेच दर्शनाची व्यवस्था करता येईल का? याबाबत विचार करावा अशी मागणी सुजय विखे यांनी केली आहे. व्हीआयपींना ठराविक वेळेतच दर्शन दिल्यास सर्वसामान्यांना दिवसभरात सुकर दर्शन घेता येईल असे विखे यांनी म्हटले आहे.
राजकीय पुनर्वसनाबद्दल केलेल्या आपल्या वक्तव्यावर माजी खासदार सुजय विखे यांनी स्पष्टीकरण दिले आहे. त्यांनी म्हटले की, मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष ठरवतील की त्यांना कोणते पद द्यायचे. सत्काराच्या कार्यक्रमात सर्व उपस्थित होते, त्यामुळे वातावरण गंभीर होते.
त्यामुळे त्यांनी मार्मिक टिप्पणी केली, जी बातमी बनली. कार्यक्रम सत्काराचा होता, शोकसभा नव्हती. जनतेची सेवा करण्यासाठी त्यांना कोणत्याही पदाची आवश्यकता नाही, आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर त्यांचा पूर्ण विश्वास असल्याचे सुजय विखे यांनी स्पष्ट केले.