पंढरपूर-बारा जिल्ह्यांतील शेतकऱ्यांवर लादण्यात येणारा शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्याची सद्बुध्दी पांडुरंगाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना द्यावी, अन्यथा आम्हाला त्यांच्या विरोधात लढण्याची शक्ती द्यावी, असे साकडे माजी खासदार तसेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी पंढरीत येऊन घातले.
शक्तिपीठ महामार्गाला सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातून मोठा विरोध होत असून यासाठी विविध
आंदोलने केली जात आहेत. आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर राजू शेट्टी, खासदार प्रणिती शिंदे, आमदार सतेज पाटील यांच्यासह शेतकरी, पदाधिकारी यांनी पंढरीत येत संत नामदेव पायरी येथे विठुरायाला साकडे घातले. यावेळी राजू शेट्टी, सतेज पाटील यांनी वारकरी फेटा, कपाळी गंध, बुक्का, हातात वीणा व टाळ घेतला होता. तर प्रणिती शिंदे यांनी देखील गळ्यात टाळ घेऊन शक्तिपीठविरोधात घोषणाबाजी केली.
यावेळी बोलताना राजू शेट्टी यांनी, शेतकऱ्यांची कसलीही मागणी नसताना बारा जिल्ह्यांतून हा महामार्ग काढण्यात आला आहे. याचा खर्च ३५ हजार कोटी रुपये असताना आता तो ८० हजार कोटींहून अधिक दाखविण्यात येत आहे. याद्वारे सरकारला ५० हजार कोटी रुपयांचा घोटाळा करायचा असल्याचा आरोप केला.
आमदार सतेज पाटील यांनी, शक्तिपीठ महामार्गाला दुसरा समांतर रस्ता असताना बाच मार्गाचा अट्टहास का असा प्रश्न केला. तसेच ज्या कामाची मागणी नाही तो विरोध असताना करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र, शेतकऱ्यांकडून कर्जमाफीची मागणी होत असताना यावर कोणताही निर्णय होत नसल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले.यावेळी शेतकरी संघटनेचे नेते सचिन पाटील, तानाजी बागल, रवी मोरे, दामू इंगोले, विजय रणदिवे, किशोर ढगे, शिवाजी पाटील, अजित बोरकर, किरण घाडगे, राहुल कौलगे, संदीप पाटील, प्रताप गायकवाड आदी उपस्थित होते.