बीड : प्रतिनिधी
अंबाजोगाई येथे शक्तिपीठ महामार्गाच्या मोजणीसाठी आलेल्या अधिका-यांना शेतक-यांनी आणि महिलांनी जमिनीची मोजदाद न करता वापस पाठवले. यावेळी महिलांनी तीव्र भावना व्यक्त करताना, जमिनी घेऊ नका, वाटल्यास लाडकी म्हणून देत असलेले, दीड हजार रुपये देऊ नका, असा टोला महायुती सरकारला लगावला.
शक्तिपीठ महामार्ग हा राज्यातील सर्वांत मोठा ७६० किलोमीटरचा महामार्ग असणार आहे. बीड जिल्ह्यातून अंबाजोगाई आणि परळी येथून हा महामार्ग जात आहे. या महामार्गासाठी आवश्यक असलेल्या जमिनीच्या मोजणीसाठी अधिकारी आले होते. त्यावेळी शेतकरी आणि महिलांनी तीव्र विरोध केला.
अंबाजोगाई तालुक्यातील पिंपळा, धायगुडा, भारज, गित्ता, वरवटी गावातील शेतक-यांनी एकत्र येत, अधिका-यांकडून जमिनीची सुरू असलेल्या मोजणीला विरोध केला. शेतकरी आणि महिलांनी एकत्र येत, ‘शक्तिपीठ’साठी एक इंच देखील जमीन देणार नाही, असा इशारा अधिका-यांना दिला. जमिनीची मोजदाद देखील करून दिली नाही. अधिका-यांना शेतकरी आणि महिलांनी तेथून घालवून दिले.
शेतक-यांबरोबर महिलांनी शक्तिपीठ महामार्गाविरोधात यावेळी जोरदार घोषणाबाजी केली. महिलांनी महायुती सरकारला विनंती करताना, सरकारने लाडक्या बहिणीच्या जमिनी घेऊ नयेत, वाटल्यास लाडकी म्हणून देत असलेले दीड हजार रुपये वापस घ्यावेत. पण आमच्या जमिनी घेऊ नयेत. जमिनी घेतल्या तर आम्ही काय खायचे? असा सवाल केला.
अंबाजोगाई येथे शेतकरी आणि महिलांनी घेतलेल्या भूमिकेला शेतकरी कामगार पक्षाने पाठिंबा दिला. शेतक-यांच्या बाजूने आक्रमक भूमिका घेऊ, आम्ही शेतक-यांच्या सोबत आहोत. वेळ पडली तर आम्ही आंदोलन करू, असा इशारा दिला. नागपूर ते गोवा जाणा-या या शक्तिपीठ महामार्गाला आता राज्यभरातील अनेक ठिकाणांहून विरोध होत आहे. कोल्हापूरमध्ये पहिल्यापासून या महामार्गाविरोधात शेतकरी आणि काँग्रेसने आक्रमक भूमिका घेत विरोध सुरू ठेवला आहे.