21 C
Latur
Wednesday, February 4, 2026
Homeलातूरशक्तिपीठास जमीन घेताना शेतक-यांचा अन्त पाहू नका

शक्तिपीठास जमीन घेताना शेतक-यांचा अन्त पाहू नका

भेटा : वार्ताहर
भेटा परिसरातून जाणा-या शक्तीपीठ महामार्गास शेतकरी जमीन देण्यासाठी तयार नाहीत आणि ते सक्तीने जमीन घेत आहेत. विकासासाठी शक्तीपीठ महामार्ग बनवायचा असेल तर सहमती आवश्यक आहे. वारंवार नोटीसा, पोलिस, अधिकारी बोलावून शेतक-यांचा छळ कशासाठी सुरू आहे. शेतक-यांचा शेवट पाहू नका, असा इशारा माजी आमदार धिरज विलासराव देशमुख यांनी दिला.
औसा तालुक्यातील भेटा येथे काँग्रेस आघाडीचे भादा जिल्हा परिषद गटाचे उमेदवार पूजा आण्­णासाहेब होदाडे, भादा पंचायत समिती गणाचे उमेदवार किशोर देविदास जवंजाळे यांच्या प्रचारासाठी प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते हणमंत पवार यांच्या उपस्थितीत आयोजित प्रचार कॉर्नर सभेत मतदारांशी संवाद साधताना ते बोलत होते.
माजी आमदार धिरज देशमुख म्हणाले की, ज्या ठिकाणी सहमती असेल तिथे शक्तीपीठ महामार्ग तयार करा. ज्या ठिकाणी सहमती नसेल त्या ठिकाणी शक्तीपीठ रद्द करा गोव्याहून नागपूरला जाण्यासाठी घाई कोणाची आहे. ज्यांना लवकर जायचे आहे. त्यांना विमानसेवा तसेच महामार्ग आहे.
शेतक-यावर कसलीही सक्ती लादू नका जेणेकरून शेतक-यांच्या सुपीक जमिनी ज्यावर प्रपंच चालतो ज्यावर मुलांचे भविष्य आहे. त्यांची स्वप्न मोठी होण आवश्यक आहे. विशेष म्हणजे आजपर्यंत झालेल्या कामाच्या बळावर आम्ही मतदारांना मत मागत आहोत. लातूर ग्रामीणमध्ये महाविकास आघाडी सरकारच्या काळात जी विकासाची कामे आम्ही केली. त्यानंतर कसलेही विकासाचे काम भाजपने केले नाही. त्यामुळे त्यांना जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत मतदारांना मत मागण्याचा अधिकार नाही, असे सांगून येणा-या ७ तारखेला काँग्रेसच्या सर्व उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करा असे आवाहन माजी आमदार तथा लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष धीरज विलासराव देशमुख यांनी केले.
यावेळी सदाशिव कदम, सतिश शिंदे, दत्तप्रसाद शिंदे , रुषीकेश मुरकुळे, सूर्यकांत पाटील, धनंजय पाटील, सरपंच शाम शेळके, उपसरपंच दगडू ढोले, चेअरमन श्रीकृष्ण माने, रमाकांत कांबळे, दगडू मुळे, बालाजी लोंढे, गोविंद जाधव, हबीब मनियार तसेच काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते महिला, पुरुष गावातील असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. सुत्रसंचलन नागनाथ जाधव यांनी केले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR