मुंबई : प्रतिनिधी
शक्तिपीठ महामार्गाची मागणी कोणी केली होती? शक्तिपीठ मार्गाची मागणी करून गेल्या काही वर्षांत ठेकेदारांकडून मोठ्या प्रमाणात पैसे उकळले गेले. त्यांच्याकडून हजारो कोटी रुपये आधीच काढून घेतले. टेंडर देण्यात आले. ते पैसे निवडणुकीतच वापरले असतील किंवा आमदार खरेदीसाठी वापरले असावेत, असा मोठा आरोप करत, शक्तिपीठ मार्गासाठी शेतकरी भूमी अधिग्रहण करण्याच्या विरोधात आहेत. मुळात शक्तिपीठ महामार्गाची गरज काय, अशी विचारणा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे.
पत्रकारांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, देवेंद्र फडणवीस म्हणाले की, शक्तिपीठ महामार्गासाठी १०० शेतकरी त्यांना भेटले. हे १०० शेतकरी जे आहेत, ते भाजपाचे एजंट असावेत. त्यांच्या माध्यमातून जमीन खरेदी-विक्रीचे व्यवहार सुरू असावेत. सामान्य शेतक-यांना आपली जमीन द्यायची नाही.
शेतकरी रस्त्यावर उतरला आहे. तुमच्याकडे १०० शेतकरी आले म्हणून चुकीच्या योजनेचे समर्थन होऊ शकत नाही. हा महामार्ग खरेच गरजेचा आहे का, हे तुम्ही महाराष्ट्राला पटवून द्यावे. तुम्हाला तुमच्या मर्जीतील ठेकेदारांना मालामाल करून त्या पैशातून निवडणुका लढवायच्या आहेत, म्हणून शक्तिपीठ महामार्ग हवा का, या शब्दांत संजय राऊत यांनी महायुती सरकारवर हल्लाबोल केला.
पुढे बोलताना संजय राऊत म्हणाले की, जाहीरनाम्यात त्यांच्या दोन प्रमुख घोषणा आहेत, लाडक्या बहिणींना २१०० रुपये आणि शेतक-यांना कर्जमाफी. त्याचे तुम्ही काय करणार याचे उत्तर जनतेला मिळायला हवे. ९ लाख ३२ हजार कोटींचे महाराष्ट्रावर कर्ज आहे. हा एवढा मोठा कर्जाचा डोंगर तुम्ही कसा कमी करणार आहात? राज्यावरचे कर्जाचे ओझे दिवसेंदिवस वाढत चालले आहे.
हे माहिती असताना ‘लाडकी बहीण’सारख्या योजना आणल्या. आता त्या बंद करायच्या मार्गावर आहेत. शिवभोजन थाळीसारख्या गरिबांच्या योजना, शिधा योजना अशा अनेक योजना बंद केल्या. आता लाडकी बहीण योजना बंद करतील, असा मोठा दावा संजय राऊतांनी यावेळी बोलताना केला.
हे कसले हिंदुत्व?
दरम्यान, वरळीत होळीला परवानगी मिळत नाही. त्यानंतर आता उद्या गणेशोत्सव येणार आहे. पीओपीच्या मूर्तींवर बंदी आणलेली आहे, हे कसले हिंदुत्व? वर्षातून एकदा येणा-या सणावर तुम्ही बंधन आणत आहात. आमच्या राज्यात हिंदूंचे सण खुल्या वातावरणात होतील सांगता होता, मग आता काय झाले, अशी विचारणाही संजय राऊत यांनी केली आहे.