मुंबई : प्रतिनिधी
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यात निष्पाप पर्यटकांचा बळी गेला. या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेत भारताने चोख प्रत्युत्तर दिले. काल मध्यरात्री ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत भारताने काल मध्यरात्री पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानात मिसाईल हल्ला केला. सामान्य नागरिकांप्रमाणेच देशातील अनेक राजकीय नेत्यांनीही या कारवाईचे कौतुक केले असून देशातील ज्येष्ठ नेते, राजकारणी, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनीही प्रतिक्रिया दिली. आज सकाळीच त्यांनी ट्वीट करत भारतीय सैन्य दलाचे कौतुक केले होते.
दरम्यान, काल मध्यरात्री ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत भारताने काल मध्यरात्री पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानात मिसाईल हल्ला केला. जवळपास ९ दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त झाले आणि १०० हून अधिक दहशतवादी मारले गेले.
त्यानंतर काही वेळापूर्वीच राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधत ‘ऑपरेशन सिंदूर’वर सविस्तर प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाचे कौतुकही केले. भारतीय नेतृत्व आणि भारतीय सेना यांच्यामध्ये कोणतेही अंतर नाही हे जगाला कळले. आज सगळा देश एअर फोर्सच्या पाठीमागे आहे, अशी आमची भूमिका आहे, असे पवार यांनी स्पष्ट केले.
दहशतवाद्यांच्या हल्ल्यात निष्पाप बहिणींचे कुंकू पुसले गेले होते, त्यामुळे भारत सरकारने दहशतवाद्यांवर केलेल्या कारवाईला दिलेले ‘ऑपरेशन सिंदूर’ हे नाव अतिशय योग्य असल्याचेही शरद पवार म्हणाले.
गेल्या काही आठवड्यांत देशात जे घडलं त्यामुळे लोकांमध्ये प्रचंड अस्वस्थता होती. लोकं पलीकडून येतात, हल्ला करतात. पण यामध्ये सरकारला कुठलीही बघ्याची भूमिका घेता येत नाही. जो काश्मीरचा भाग पाकिस्तानने घेतला (पाकव्याप्त काश्मीर) तिथे हल्ला केला आहे. या ठिकाणी दहशतवाद्यांचे कॅम्प आहेत, तिथे दारूगोळा ठेवला जातो. पाकिस्तानची बॉर्डर आपण ओलांडून गेलो नाही ती काळजी हवाई दलाने घेतली. काश्मीरमध्ये जे काही झालं त्यानंतर देशातील काही लोकांच्या मनात काश्मिरी लोकांबाबत शंका होती.
जम्मू-काश्मीर विधानसभेत अधिवेशन घेऊन या हल्ल्याचा निषेध केला गेला. मुख्यमंत्र्यांनी भाषणात स्वच्छ भूमिका घेतली . भारतीय नेतृत्व आणि भारतीय सेना यांच्यामध्ये कोणतेही अंतर नाही हे जगाला कळले आहे, असे शरद पवार म्हणाले. आंतरराष्ट्रीय राजकारणात भारत आक्रमक अशी प्रतिमा जाऊ नये. आज सगळा देश एअर फोर्सच्या पाठीमागे आहे, अशी आमची भूमिका असल्याचेही शरद पवार यांनी स्पष्ट केले.
सतर्क राहण्याची गरज आहे
भारतात दहशतवादी हल्ला झाला, त्यानंतर भारताने कारवाई करून दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त करत प्रत्युत्तर दिले. हल्ल्याच्या या अॅक्शननंतर अमेरिका, जपान या देशांनी भारताला समर्थन दिले आहे. मात्र चीनने समर्थन दिले नाही ही काळजी करण्यासारखी गोष्ट असल्याचे पवार म्हणाले. युद्ध होईल की नाही आज सांगणे योग्य नाही मात्र सतर्क राहण्याची गरज असल्याचा इशाराही त्यांनी दिला. पाकिस्तानला त्यांची आणि भारताची ताकद माहीत आहे त्यामुळे आपल्याला सतर्क राहावे लागेल. आर्थिक कोंडी कशी करता येईल या दृष्टीने पावले टाकली पाहिजेत, असेही ते म्हणाले.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यात अनेक पर्यटक मारले गेले. त्यात अनेक निष्पाप बहिणींचे कुंकू पुसले गेले. त्यामुळे भारताने कालची कारवाई करताना त्याला ‘ऑपरेशन सिंदूर’ हे जे नाव दिले ते योग्य आहे, असे मतही शरद पवार यांनी व्यक्त केले. अशावेळी संकुचित वृत्ती ठेवणे योग्य नाही. आज आपण एकत्र राहूया असे आवाहनही त्यांनी केले. जो काही संयम ठेवायला पाहिजे तो इंडियन एअर फोर्सने ठेवायचा आहे. भारताची भूमिका आक्रमक नव्हती. आता सबंध देशाने सावध राहून सरकारला सहकार्य करावे लागेल, असे पवार म्हणाले.