पुणे : प्रतिनिधी
अजित पवार यांच्या राष्ट्रवादी गटाच्या विरोधात लढण्यासाठी शरद पवार यांच्याकडे इच्छुक उमेदवारांची गर्दी झाली आहे. त्यामुळे येणा-या विधानसभा निवडणुकीत पवार विरुद्ध पवार असा सामना रंगण्याची चिन्ह दिसत आहेत.
दरम्यान, आगामी विधानसभा निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेस विरोधात लढण्यासाठी शरद पवार यांच्या गटातून अनेक उमेदवार इच्छुक असल्याने या उमेदवारांच्या अर्जाची भाऊगर्दी झालेली दिसत आहे.
अमळनेरमध्ये अजित पवार गटाचे अनिल पाटील यांच्या विरोधात लढण्यासाठी शरद पवार यांच्याकडे २९ इच्छुक उमेदवारांचे अर्ज आले आहेत. परळीत धनंजय मुंडे यांच्या विरोधात १३ इच्छुकांचे अर्ज आले आहेत. उदगीरमध्ये संजय बनसोडेंच्या विरोधात १२ अर्ज आले आहेत. तर येवल्यातून छगन भुजबळ यांच्या विरोधात ११ इच्छुकांनी अर्ज दिले आहेत.
कागलमध्ये हसन मुश्रीफ यांच्या विरुद्ध लढण्यासाठी ८ इच्छुक आहेत. आहेरीत धर्मरावबाबा आत्राम यांच्या विरोधात ७ इच्छुकांचे अर्ज आहेत. त्याचबरोबर आंबेगावातून दिलीप वळसे पाटील यांच्या विरोधात ३ अर्ज आले आहेत. त्यामुळे शरद पवार यांच्या गटाकडून विधानसभा लढवणा-यांची गर्दी वाढत आहे. आगामी विधानसभेत यामुळे अजित पवार यांच्या गटाला धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.