मला ते गुगली टाकणार नाहीत : एकनाथ शिंदे
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
शरद पवारांनी टाकलेली गुगली ही कुणालाही समजत नाही, बाजूला बसलेल्यांना आणि बाजूला बसवणा-यांनाही ती समजत नाही. पण पवार साहेब मला कधीही गुगली टाकणार नाहीत, असे वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. राजकारणात नाते कसे जपायचे हे पवार साहेबांकडून शिकावे असे म्हणत त्यांनी शरद पवार यांच्यावर स्तुतीसुमने उधळली.
ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना महादजी शिंदे राष्ट्र गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पुण्यातील सरहद संस्थेच्या वतीने हा पुरस्कार देण्यात आला. त्यावेळी माजी केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे उपस्थित होते.
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन यंदा दिल्लीत होत आहे. त्या निमित्ताने सरहद संस्थेच्या वतीने आयोजित कार्यक्रमात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणा-या सन्माननीय व्यक्तींचा गौरव करण्यात आला. यावेळी महादजी शिंदे राष्ट्र गौरव पुरस्कार देऊन एकनाथ शिंदे यांना सन्मानित केले. पाच लक्ष रुपये, मानपत्र, सन्मानचिन्ह आणि शिंदेशाही पगडी असे पुरस्काराचे स्वरुप आहे.
शिंदेंचे जावई पवार यांच्या हस्ते शिंदेंचा गौरव
यावेळी बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, महादजी शिंदे या पुरस्काराने आपल्याला गौरवण्यात येत आहे. यावेळी स्टेजवर ज्योतिरादित्य शिंदे उपस्थित आहेत आणि ज्यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात येत आहे ते शरद पवार हे क्रिकेटपटू सदाशिव शिंदे यांचे जावई आहेत.