पुणे : प्रतिनिधी
पहलगाम हल्ल्यातील मृतांमध्ये महाराष्ट्रातील ६ जणांचा समावेश आहे. त्यांचे पार्थिव आणि कुटुंबीय गुरुवारी (दि. २४) महाराष्ट्रात दाखल झाले. मृतांवर शोकाकुल वातावरणात आज अन्त्यसंस्कार केले जाणार आहेत. पुणे येथील कौस्तुभ गनबोटे यांचे पार्थिव त्यांच्या राहत्या घरी साळवे गार्डन, अप्पर इंदिरानगर येथे आणण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शरद पवार यांनीदेखील गनबोटे यांच्या पार्थिवाचे दर्शन घेतले. परिसरात शोककळा पसरली. त्यांच्या अन्त्यदर्शनासाठी शेकडो नागरिक आणि राजकीय नेते उपस्थित होते.
दरम्यान, पहलगामच्या बैसरण खो-यात दहशतवाद्यांनी पर्यटकांवर भ्याड हल्ला केला. या हल्ल्यात २८ जणांचा मृत्यू झाला. यामध्ये पुण्याचे कौस्तुभ गनबोटे यांचा समावेश होता. अन्त्यविधीनंतर गनबोटे कुटुंबियांचे सांत्वन केले असता गनबोटे यांच्या पत्नीने शरद पवार यांना पहलगामच्या बैसरण व्हॅलीमधील हल्ल्यावेळचा थरार सांगितला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, शिवसेनेचे (उबाठा गट) वसंत मोरे, काँग्रेसचे अरविंद शिंदे, आम आदमी पार्टीचे एकनाथ ढोले आदींची उपस्थिती होती.
गनबोटे यांच्या पत्नी म्हणाल्या की, जीव वाचवण्यासाठी आम्ही कपाळावरील टिकल्या काढून फेकल्या. दहशतवाद्यांसमोर जोरजोरात अजान म्हणू लागलो. त्यानंतर माझ्या नव-याचा मित्र एका कोप-यात बसला होता, त्याला दहशतवाद्यांनी बोलावून घेतले.
‘…अजान पढता हैं क्या…, बोलता हैं क्या कुछ… असं विचारलं.’
आम्ही त्या दहशतवाद्याचं ऐकून भराभरा टिकल्या काढून फेकल्या, कारण आम्हाला मारायला नको म्हणून आणि सगळे ‘अल्लाहू अकबर…, अल्लाहू अकबर…’ म्हणायला लागलो. आम्ही जोरजोरात ‘अल्लाहू’चा धावा करायला लागलो, असा चित्तथरारक प्रसंग गनबोटे यांच्या पत्नीने सांगितला.