बीड : प्रतिनिधी
पुण्यातील शस्त्र निरीक्षण शाखा महाराष्ट्र राज्य यांनी घेतलेल्या परीक्षेत बीड जिल्हा पोलिस दलातील महिला कर्मचारी विमल कोठुळे यांनी राज्यात अव्वल क्रमांक पटकावला आहे. बीडच्या ‘खाकी’तील ‘लाडकी बहीण’ अव्वल आल्याने बीड पोलिसांची डागाळलेली प्रतिमा उंचावली आहे.
दरम्यान, विमल नंदकिशोर कोठुळे या सामान्य कुटुंबातील आहेत. भरती झाल्यापासून पोलिस दलासोबत त्या प्रामाणिक राहिल्या. त्यामुळेच त्यांना महत्त्वाच्या असणा-या शस्त्र दुरुस्ती व देखभाल प्रशिक्षणासाठी पुण्याला पाठवले. यात राज्यभरातील ७५ घटकांतील अधिकारी, कर्मचारी सहभागी होतात.
यात वार्षिक परीक्षा घेण्यात येते. यात ९०० पैकी ७८८ गुण मिळवून विमल यांनी राज्यात प्रथम क्रमांक पटकावला. शस्त्र निरीक्षण शाखेच्या पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी प्रमाणपत्र, चषक देऊन सन्मानित केले.
यावेळी मुख्याध्यापक उपनिरीक्षक डॉ. प्रल्हाद शेळके, शिक्षक सफौ. संजय तावरे यांनी मार्गदर्शन केले. बीडचे पोलिस अधीक्षक नवनीत काँवत, अपर अधीक्षक सचिन पांडकर यांच्यासह जिल्हा पोलिस दलाने त्यांच्या यशाचे स्वागत केले आहे.
१ जून २०२४ ते २८ मार्च २०२५ या कालावधीत प्रशिक्षण झाले. यात तीन, सहा महिने अशा दोन परीक्षांतही विमल यांनी तृतीय क्रमांक पटकावला होता. त्यानंतर १२ महिन्यांनी वार्षिक परीक्षा घेतली, त्यात अव्वल क्रमांक पटकावला. यामुळे बीड जिल्हा आणि पोलिस दलाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. शस्त्र निरीक्षण शाखा ही एक स्वतंत्र शाखा असते. रायफल, बंदूकसह इतर सर्व शस्त्रांची देखभाल आणि दुरुस्ती या विभागातून केली जाते. अचानक काही बिघाड झाला, तर याच कर्मचा-यांकडून दुरुस्ती केली जाते.
पहिल्यांदाच महिला अव्वल
१९६७ पासून हे प्रशिक्षण दिले जाते, परंतु आतापर्यंत पुरुषच राज्यात अव्वल येत होते. पहिल्यांदाच महिला कर्मचारी राज्यात अव्वल आल्या आहेत. त्यामुळे हा विक्रमही विमल कोठुळे यांच्या नावावर झाला आहे. या परीक्षेत धुळ्याचे अभिनय सावंत (७६४ गुण) द्वितीय, तर सोलापूर ग्रामीणच्या अनिता जामदार (७३९ गुण) या तृतीय आल्या आहेत.