लातूर : प्रतिनिधी
शहराजवळून जाणा-या रिंगरोड लगत सर्व्हिस रोडवर वाहने पार्किंग करु नयेत असे निर्देश असतानाही शहराच्या चारही बाजूच्या रिंगरोडच्या सर्व्हीस रोडचा वापर हा केवळ ट्रक व तत्सम वाहनांच्या पार्कींगसाठीच होतो आहे. लातूर शहर महानगरपालिकेने १७-१८ दिवसांपूर्वी सर्व्हीस रोडवर पार्कींग केलेल्या वाहनांवर दंडात्मक कारवाई केली होती. परंतू, त्यानंतर मनपाची कारवाई थंडावल्याने पुन्हा वाहनांनी रिंग रोडच्या सर्व्हीस रोडवर कब्जा केला आहे. मनपाची कारवाई थंडावल्याने सर्व्हीस रोडवर वाहनांची गर्दी वाढली आहे.
रिंगरोडवरुन वाहने वेगात जातात. अशा स्थितीत त्या परिसरातील नागरिक आणि वाहनधारकांच्या सोयीसाठी सर्व्हिस रोड तयार करण्यात आला आहे. परंतु गेल्या कांही महिन्यांपासून या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहने पार्क केली जात आहेत. या संदर्भात मनपाने काही दिवसांपूर्वीच निर्देश देऊन सर्व्हिस रोडवर वाहने पार्क केल्यास दंड करण्याचा इशारा दिला होता. नुसता इशाराच नाही तर अशा वाहनांवर कारवाई करुन दंडही वसूल केला होता. त्यानंतर मात्र, लातूर शहर महानगरपालिकेची कारवाई थंडावल्याने सर्व्हीस रोडवर वाहन पार्कींगची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. रिंग रोडच्या दुतर्फा असलेल्या सर्व्हीस रोडवर मोठी वाहने मोठ्या संख्येने पार्कींग केलेली दिसून येत आहेत.
शहरातील राजीव गांधी चौक ते गरुड चौक, गरुड चौक ते सिद्धेश्वर चौक, सिद्धेश्वर चौक ते पु. अहिल्यादेवी होळकर चौक, पु. होळकर चौक ते रेल्वे स्टेशन रोडपासून ते एमआयडीसीपर्यंत आणि पीव्हीआर चौक रिंग रोड ते औसा रोड छत्रपती चौकापर्यंत रिंग रोडच्या दुतर्फा सर्व्हीस रोडवर चारचाकी वाहनांची पार्कींग मोठ्या प्रमाणात होत आहे. रिंग रोडचा सर्व्हींस रोड पार्कीगसाठीच आहे की काय?, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत असून लातूर शहर महानगरपालिकेने कारवाई करुन सर्व्हीस रोड मोकळा करावा, अशी मागणी नागरिकांच्या वतीने करण्यात आली आहे.