25 C
Latur
Saturday, November 23, 2024
Homeलातूरशहरातून १३ हजार गणेश मूर्तींचे संकलन

शहरातून १३ हजार गणेश मूर्तींचे संकलन

लातूर : प्रतिनिधी
जल प्रदूषण टाळण्यासाठी मनपाच्या वतीने राबविण्यात आलेल्या गणेश मूर्ती संकलन उपक्रमा अंतर्गत शहरातून जवळपास १३ हजार  गणेश मूर्ती संकलित करण्यात आल्या. या सोबतच यंदा निर्माल्य संकलनासाठी पालिकेने ठेवलेल्या कलशामध्ये गणेशभक्तांनी आठ क्विंटल निर्माल्याचे दान केले. या निर्माल्यापासून खत निर्मिती केली जाणार आहे.
परंपरेप्रमाणे गणेश मूर्तींचे जलाशयात विसर्जन केले जाते. मूर्तीसोबत निर्माल्यही पाण्यात टाकले जाते. यामुळे जलस्त्रोत प्रदूषित होतात. ते टाळण्यासाठी मनपा घरगुती तसेच सार्वजनिक गणेश मंडळाकडूनही मूर्ती संकलित करते. या सर्व मूर्तींचेनंतर बारा नंबर पाटी परिसरातील खाणीमध्ये विधिवत विसर्जन केले जाते. या उपक्रमा अंतर्गत पालिकेने यावर्षी शहरात १५ ठिकाणी मूर्ती संकलन केंद्रे उभारली होती. त्यासाठी जवळपास ४००  अधिकारी व कर्मचारी नियुक्त्त केले होते. या केंद्रावर गणेश मूर्तींचे संकलन करण्यात आले. मूर्ती सोबतच भक्त्तंना निर्माल्य टाकता यावे यासाठी कलशही ठेवण्यात आले होते. या कलशांमध्ये ८०० किलो निर्माल्य संकलित झाले.
महानगरपालिकेने नांदेड रस्त्यावरील यशवंत शाळेत उभारलेल्या संकलन केंद्रात २१६ मूर्तींचे संकलन झाले. विवेकानंद चौकातील पाण्याची टाकी परिसरात २२९,मंठाळे नगर मधील मनपा शाळा क्रमांक नऊ मध्ये ५५२ घरगुती व सार्वजनिक मंडळांच्या २ मुर्ती,सिद्धेश्वर मंदिर परिसरात १७२० घरगुती व १५ सार्वजनिक मंडळांच्या मूर्ती संकलित करण्यात आल्या. जिल्हाधिकारी कार्यालया जवळील शासकीय विहीर परिसरात ३६५,बार्शी रस्त्यावरील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या  पाण्याच्या टाकीच्या परिसरात ११७४ घरगुती व मंडळांच्या ४ मुर्ती  तसेच दयानंद महाविद्यालयाच्या पार्किंग परिसरात ४६० घरगुती व २ मंडळाच्या भक्तांनी मूर्ती मनपाच्या कर्मचा-यांकडे सुपूर्द केल्या.सरस्वती कॉलनीतील पाण्याची टाकी परिसरात एका मंडळाने व ९७५ नागरिकांनी तर टाऊन हॉल परिसरात घरातील ६४४ आणि मंडळांच्या ६ मुर्ती जमा झाल्या.
बांधकाम भवन येथे घरगुती २३३७ व सार्वजनिक मंडळांच्या ५९ ,कव्हा रस्त्यावर खंदाडे नगरमध्ये घरगुती २५०३ घरगुती व सार्वजनिक २० मुर्ती जमा झाल्या.साळे गल्लीतील यशवंत शाळा २७९ नागरिकांनी आणि तिवारी यांच्या विहिरीजवळ ७३३ घरगुती व ६ सार्वजनिक गणेश मूर्ती संकलित झाल्या.गणेश नगर येथे २२२ घरगुती व काशी विश्वेश्वर मंदिराच्या ग्रीन बेल्ट मध्ये ३६७ मुर्ती भक्तांनी मनपा कर्मचा-यांकडे आणून दिल्या. सार्वजनिक गणेश मंडळांच्याही मूर्ती मनपाकडे देण्यात आल्या. एकूण १२ हजार ७७६ गणेश मूर्तींचे संकलन यावर्षी मनपाच्या वतीने करण्यात आले. शहरातील गणेश भक्तांनी मनपाच्या आवाहनाला प्रतिसाद देत आपल्या घरातील गणेश मूर्ती संकलन केंद्रात जमा केल्या. याबद्दल मनपा आयुक्त्त बाबासाहेब मनोहरे यांनी आभार मानले आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR