24.5 C
Latur
Thursday, May 22, 2025
Homeलातूरशहरात दोन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण 

शहरात दोन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण 

लातूर : प्रतिनिधी 
पाच वर्षांपुर्वी कोरोनाने संपूर्ण जगाला आपल्या कवेत घेतले होते.  आता पुन्हा कोरोना व्हायरसच्या नव्या स्ट्रेनने पाय पसरायला सुरुवात केली आहे. त्यातच लातूर शहरामध्ये कोरोना पॉझिटिव्हचे दोन रुग्ण आढळल्याने आरोग्य यंत्रणा पुन्हा एकदा सक्रीय झाली आहे.
कोरोनाचा पहिला व्हायरस २०१९ मध्ये आला होता. संपूर्ण जगासोबत भारतातही करोनाचा व्हायरस पसरला होता. परंतू, लातूर जिल्ह्यात खुप उशिराने कोरोना व्हायरसची लागण झाली होती. पाहता पाहता संपूर्ण जिल्हाभर कोरोना पसरला होता. आरोग्य यंत्रणेच्या अथक परिश्रमासोबतच नागरिकांच्या सहकार्याने जिल्ह्यातील करोनाचा फैलाव रोखण्यात यश आले होते. परंतु, तोपर्यंत अनेकांना आपला जीव गमवावा लागला होता. आता पुन्हा पाच वर्षांनंतर कोरोनाचा व्हायरस नव्या स्ट्रेनने डोके वर काढत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या कोविड डॅशबोर्डवर उपलब्ध असलेल्या माहितीनूसार देशभरात कोरोनाचे रुग्णांची नवीन प्रकरणे नोंदविली जात आहेत.
लातूर शहर महानगरपालिके अंतर्गत दि. २२ मे २०२५ पर्यंत दोन कोविड पॉझिटिव्ह रुग्णांचा अहवाल या कार्यालयास प्राप्त झाला आहे.  दोन्ही पेशंटची प्रकृती स्थिर आहे.  एका रुग्णाचा खाजगी हॉस्पिटलमधून रिपोर्ट झालेला असून दुसरा रुग्ण विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथून रिपोर्ट झालेला आहे. गंभीर रित्या आजारी एकही रुग्ण सद्यस्थितीमध्ये दाखल झालेला नाही. दोन्ही रुग्णांवर उपचार सुरु आहेत. कोरोनाची ही नवीन स्ट्रेन कोविड १९ च्या पहिल्या आणि दुस-या म्युटेशनएवढी संसर्गजन्य नसू शकते. परंतु, इतर आजरांनी ग्रस्त असलेल्या लोकांवर याचा नकारात्मक परिणाम होऊ शकत, असे आरोग्य यंत्रणेने म्हटले आहे.
नागरिकांनी घाबरू नये; खबरदारी घ्यावी 
कोरोना व्हायरसच्या नव्या स्ट्रेनने पसरतो आहे. नागरिकांनी घाबरुन न जाता या आजाराचा संसर्ग होऊ नये याकरिता  खबरदारी घ्यावी. लातूर शहर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत  योग्य ती कारवाई करण्यात येत आहे, असे लातूर शहर महानरगपालिका आरोग्य विभागाच्या वतीने सांगण्यात आले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR