लातूर : प्रतिनिधी
शहरातील नागरिकांना आठवडी बाजाराच्या दिवशी त्यांना लागणारे भाजीपाला, फळे इत्यादी खरेदी करता यावी यासाठी शहरात ७ ठिकाणी ७ दिवशी आठवडी बाजार भरविण्याचे महानगरपालिका मार्फत नियोजन करण्यात आले आहे. शहरातील नागरिकांची सोय व्हावी, रहदारीस अडथळा होणार नाही व नागरिकांना आपापल्या परिसरामध्ये भाजीपाला घेण्याची सोय व्हावी याचा विचार करून नागरिकांना आपल्या जवळच्या भागात खालीलप्रमाणे आठवडी बाजाराचे ठिकाण निश्चित करण्यात आले आहे.
सोमवार: अब्दुल कलाम चौक ते सिद्धेश्वर मंदिर जाणारा रोड, मंगळवार व शनिवार – विवेकानंद चौक पाण्याची टाकी परिसर, बुधवार -ख्वॉजानगर ग्रीन बेल्ट खाडगाव रोड, गुरुवार व रविवार कोयना सब स्टेशनच्या बाजूला सावित्रीबाई फुले उद्यानाच्या समोर, शुक्रवार-पार्थ हॉटेल ते नांदगाव वेस.
तरी शहरातील पथविक्रेते, ग्रामीण भागातून आलेले छोटे व्यावसायिक व व्यापारी यांनी महानगरपालिका व वाहतूक पोलीस यंत्रणा यांचेकडून देण्यात आलेल्या नियमाचे व सूचनांचे पालन करावे, तसेच नागरिकांनी
वरीलप्रमाणे आपल्या सोयीच्या ठिकाणी नेमून देण्यात आलेल्या दिवशी दि. १७ फेब्रुवार सोमवारपासून सदर आठवडी बाजारामधून खरेदी करून महानगरपालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांनी केले आहे.