लातूर : प्रतिनिधी
यंदाचा पावसाळा वेळेवर सुरु झाला. मृगाचा पाऊस जोरदार बरसला. लातूर शहर महानरगपालिका प्रशासनाने मान्सूनपुर्व कामे म्हणून शहरातील नाले सफाईचा मोठा गाजावाजा केला. परंतू, पहिल्याच पावसाने मनपाची धांदल उडाली. शहरावर होर्डिंगचा जसा धोका घोंगावत आहे तसा किंबहूना त्यापेक्षाही गंभीर शहरातील जुन्या, जीर्ण धोकादायक इमारतींचा धोका घोंगावत आहे. दरवर्षीच्या पावसाळ्यात लातूर शहर महानगरपालिका प्रशासन धोकादायक इमारत मालकांना नोटीस देऊन हात वर करते. यंदाही तेच घडत आहे. धोकादायक इमारती मात्र ‘जैसे थे’ आहेत.
मुंबईच्या घाटकोपरमध्ये होर्डिंग कोसळून झालेल्या दुर्घटनेत अनेकांना आपला जीव गमवावा लागला. अनेकजण जखमी झाले. या घटनेनंतर लातूर शहर महानगरपालिका प्रशासनाला जाग आली. प्रशासनाने शहरातील अधिकृत, अनाधिकृत सर्वच होर्र्डिंगज्वर कारवाईचा बडगा उगारला. त्यानंतर ही मोहिम थंड झाली. होर्डिंग मालकांना नोटीसा बजावून मनपा प्रशासनाने हात वर केले. परंतू, होर्र्डिंगचे मृत्यूचे सापळे आजही उभे आहेत. शहरातील जुन्या, जीर्ण, धोकादायक इमारतींच्या बाबतीतही हेच आहे. महानगरपालिकेच्या एका सर्व्हेक्षणानूसार शहरात १०८ धोकादायक इमारती आहेत. दरवर्षीप्रमाणे यंदाही पावसाळ्यात महानगरपालिका प्रशासनाने धोकादायक इमारत मालकांना नोटीस देण्याचे सत्र सुरु केले आहे. पण, कारवाई मात्र काहींच केली जात नाही. दरवर्षी अशी नोटीस येतच असते म्हणून इमारत मालकही त्याकडे फारसे लक्ष देत नाहीत.
शहरातील जुन्या गाव भागात ५०-६० वर्षांपुर्वीची घरे, इमारती उभ्या आहेत. यातील बहूतांश इमारती रिकाम्या आहेत. नागरिकांनी शहरात इतर ठिकाणी जागा घेऊन प्रशस्त बांधकाम करुन स्थलांतर केले आहे. परंतू, गाव भागातील जुने घर, इमारती तशाच ठेवल्या आहेत. वर्षानुवर्ष वापराविना उभ्या असलेल्या या इमारती जीर्ण होऊन धोकादायक बनल्या आहेत. काही इमारतींवर गवत, झाडं वाढल्याचे चित्र आहे. अनेक इमारती या माळवदाच्या दगडी बांधकामााच्या आहेत. काही इमारती ढासळलेल्या आवस्थेत आहेत. महानगरपालिकेच्या पाहणीत अत्यंत जीर्ण, मोडकळीस आलेल्या व धोकादायक झालेल्या इमारती निदर्शनास आल्या आहेत. अशा इमारतींचे बांधकाम धोकादायक बांधकाम व जीर्ण इमारत ही मुंबई प्रांतिक महानरगपालिका अधिनियम १९४९ चे कलम २६४ अन्वय काढून घेणे आवश्यक आहे.
शहरातील जुन्या, जीर्ण आणि धोकादायक इमारती संबंधीत मालकांनी स्वत:हून काढून घ्यावेत, अशी इमारात पडून दुर्घंना घडली आणि त्यात जीवित किंवा वित्त हानी झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी आपली राहिल, अशी नोटीस लातूर शहर महानगरपालिका प्रशासनाने धोकादायक इमारत मालकांना बजावली आहे. परंतू, अशी नोटीस दरवर्षी पावसाळ्यात येतच असते, म्हणून त्याकडे अशा इमारत मालकांकडून गांभीर्याने पाहिले जात नाही. परिणामी वर्षानुवर्षे धोकादायक इमारती उभ्या आहेत.