31.6 C
Latur
Saturday, April 12, 2025
Homeसोलापूरशहर विकास आराखडा हरकतींवर मंगळवारपासून सुनावणी

शहर विकास आराखडा हरकतींवर मंगळवारपासून सुनावणी

सोलापूर : सोलापूर महापालिकेने वीस वर्षांसाठी प्रस्तावित केलेल्या हरकतीवर सुनावणी मंगळवार दि. १५ एप्रिलपासून सुरू होणार आहे.

महापालिकेने जानेवारी महिन्यात वीस वर्षांसाठीचा शहर सुधारणा आराखडा प्रस्तावित केला. मात्र त्या आराखड्यावर महिन्याभरात तब्बल ३३७५ हरकती नोंदवण्यात आल्या. हरकतींच्या सुनावणीसाठी शुक्रवार दि. ११ एप्रिल रोजी चार सदस्यांच्या समितीची नेमणूक करण्यात आली. ही समिती मंगळवार दि. १५ एप्रिलपासून हरकतींवर सुनावणी घेणार आहे. मंगळवारी दहिटणे, शेळगी, टीपी १, रविवार पेठ या भागातील हरकतींवर सुनावणी घेण्यात येणार आहे.

बुधवारी दि. १६ एप्रिल रोजी देगाव, केगाव, बाळे, शिवाजीनगर, बसवेश्वरनगर तर गुरुवार १७ एप्रिल रोजी सोरेगाव प्रतापनगर, नेहरूनगर, कुमठे, रामवाडी, सलगरवाडी भागातील हरकतींवर सुनावणी होणार आहे.

दि. २८ एप्रिल रोजी न्यू पाच्छा पेठ, तेलंगी पाच्छा पेठ, साखरपेठ, जोडभावी पेठ, गुरुवार पेठ, बेगम पेठ, गणेश पेठ, मंगळवार पेठ, मुस्लिम पाच्छा पेठ या भागातील हरकतीवर सुनावणी होणार आहे. दि. २९ एप्रिल रोजी रेल्वे लाईन्स, उत्तर सदर बझार, दक्षिण सदर बझार, मोदी या भागांची सुनावणी आहे. दि. ३० एप्रिल रोजी टीपी दोन, टीपी चार, लक्ष्मी पेठ,मुरारजी पेठ, सिद्धेश्वर पेठ या भागांची सुनावणी आहे.

सुनावणी मे महिन्यातही चालू राहणार आहे. दि. २० मे रोजी शनिवार पेठ, गोल्डफिंच पेठ, दक्षिण कसबा, गावठाण, टी पी ३, शुक्रवार पेठ,भवानी पेठ व विजापूर रोड भागातील हरकतींवर सुनावणी होणार आहे. दि. २१ व २२ मे रोजी मजरेवाडी, कसबे सोलापूर या भागातील हरकतींवर सुनावणी आहे. दि. २३ मे रोजी उरलेल्या अन्य भागातील हरकतींवर सुनावणी होणार आहे.

सुनावणीबाबत तपशीलवार वेळापत्रक महापालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे. त्यात आवश्यकतेनुसार सुधारणा करण्यात येईल. संबंधितांना सुनावणीबाबत नोटीस दिली आहे. ज्यांच्या हरकती आहेत त्यांनी वेळेवर सुनावणीला उपस्थित रहावे असे आवाहन महापालिकेतर्फे करण्यात आले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR