लातूर : प्रतिनिधी
येथील पद्मावती शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने चालविल्या जाणा-या शारदा संगीत महाविद्यालयाच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त दि. १७ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता येथील दयानंद सांस्कृतिक सागृहात संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवानिमित्ताने महाराष्ट्रातील नामवंत गायक, वादकांच्या सुरेल मैफलीचा व गझल गायनाचा आस्वाद रसिकांना चाखण्यास मिळणार आहे.
स्व. पं. शांताराम चिगरी यांचे अनुयायी असलेले अमर कडतने या महोत्सवाच्या संदर्भात बोलताना म्हणाले, महोत्सवात भारतातील सुप्रसिद्ध सारंगीवादक उस्ताद फारुख लतीफ खां साहेब (मुंबई), चिगरी गुरुजींचे शिष्य तबलावादक तेजस धुमाळ, सध्या मुंबई गाजवत असलेला युवा गझलगायक आदित्य अमर कडतने, तबल्याची साथ संगत देणारे उत्साद तारी खांसाहेबांचे पट्टशिष्य मनी भारद्वाज (मुंबई), ऐनोद्दीन बारसी (बासरी), पंकज शिरभाते (व्हायोलिन), धनंजय वीर (गिटार) हे कलावंत सहभागी होणार आहेत. मराठवाड्यातील सुप्रसिद्ध निवेदक व साहित्यिक श्रीकांत उमरीकर हे या महोत्सवाचे निवेदन करणार आहेत.
या महोत्सवाचे उद्घाटन मुंबई येथील सुप्रसिद्ध संगीतकार शंतनू दास यांच्या हस्ते व मराठवाडा संगीत कला अकादमीचे अध्यक्ष तालमणी डॉ. राम बोरगावकर यांच्या अध्यक्षतेखाली होईल. प्रमुख पाहुणे म्हणून पुसद येथील वसंत सहकारी साखर कारखान्याचे संचालक संतोष जैन, साहित्यिक श्रीकांत उमरीकर, ज्येष्ठ पत्रकार जयप्रकाश दगडे, तालमणी प्रकाश बोरगावकर, वसंतराव बोरगावकर, सोनू डगवाले, तनुजा शहा, अर्चनाताई कडतने यांचीही प्रमुख उपस्थिती यावेळी राहील. या कार्यक्रमातच गुरुवर्य अमरजी कडतने व विजयालक्ष्मी कडतने यांचा सत्कार आयोजिण्यात आला असून, या संगीत महोत्सवाचा लातूरकर रसिकांनी लाभ घेण्याचे आवाहन पद्मावती शि. प्र. मंडळाचे संचालक अशोकराव कडतने, माजी नगरसेवक विशाल जाधव, स्वागत समिती सदस्य विश्वजित पांचाळ, मनोज शिवलकर, बालाजी चौधरी, रितू कोठारी, स्वप्नाली जाधव, जान्हवी राऊत प्रभृतींनी केले आहे.