लातूर : प्रतिनिधी
‘शालार्थ आयडी’ची एसआयटी मार्फत चौकशी सुरू आहे. अनेक शिक्षण संस्थांमधील प्राचार्य आणि मुख्याध्यापक निवृत्त झाले आहेत. काही संस्थेतील अंतर्गत वादामुळे माहिती उपलब्ध होत नाही. त्यामुळे चौकशी करताना प्राचार्य आणि मुख्याध्यापक यांच्यावर संशय निर्माण होत आहे. शालार्थ वेतन प्रणालीनुसार वेतन घेत असलेल्या सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचा-यांची अद्ययावत माहिती शिक्षणाधिका-यांकडे देण्यात आली आहे. त्यामुळे ‘शालार्थ आयडी’ची चौकशी ‘एसआयटी’ऐवजी शिक्षण संचालक, शिक्षण आयुक्त, शिक्षण सहसंचालक, शिक्षणाधिकारी यांची समिती गठीत करून करण्यात यावी, अशी मागणी लातूर जिल्हा शिक्षण समन्वय समितीच्यावतीने करण्यात आली आहे.
शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचा-यांची माहिती शिक्षणाधिकारी यांच्याकडून घेऊन ती तपासण्यात यावी. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचा-यांचे वेतन पूर्ववत सुरू ठेऊन ते बंद होणार नाही याची दक्षता घ्यावी. सदर माहिती देण्यासाठी आमचा तीव्र विरोध आहे. ‘शालार्थ आयडी’ची चौकशी ‘एसआयटी’ऐवजी शिक्षण संचालक, शिक्षण आयुक्त, शिक्षण सहसंचालक, शिक्षणाधिकारी यांची समिती गठीत करून चौकशी करण्यात यावी, अशी मागणी लातूर जिल्हा शिक्षण समन्वय समितीच्यावतीने या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
या निवेदनावर माजी आमदार शिवाजी पाटील कव्हेकर, रामदास पवार, वसंत पाटील, प्रा. गोविंद घार, बाबूराव जाधव, जे. जी. सगरे, प्राचार्य डी. एन. केंद्रे, प्रभाकर बंडगर, मधुकर पात्रे, प्रकाश देशमुख, जी. व्ही. माने, चंद्रकांत साळुंके, कालिदास माने, अजय आरदवाड, बबन भोसले, प्रा. ओमप्रकाश साकोळकर, शिवराम सूर्यवंशी, प्रा. मारुती सूर्यवंशी आदींच्या स्वाक्ष-या आहेत.