लहान मुलांची झोप पूर्ण व्हावी म्हणून शाळांची वेळ खूप लवकर न ठेवता थोडी उशिरा ठेवावी, अशी सूचना महाराष्ट्र राज्याच्या शिक्षण खात्याच्या एका कार्यक्रमामध्ये अधिकृत व्यासपीठावर राज्यपाल रमेश बैस यांनी केल्यामुळे एका नवीन विषयावर पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. वास्तविक, आज बहुतांश शाळांकडे पुरेशा इमारती नसल्याने दोन सत्रांत शाळा भरवल्या जातात. यापैकी प्राथमिक शाळा सकाळी आणि माध्यमिक शाळा दुपारच्या सत्रात भरतात. त्यामध्ये बदल करून माध्यमिक शाळा सकाळी आणि प्राथमिक शाळा दुपारी भरवणे हा यातील उत्तम मार्ग आहे. तसेच मुलांना पुरेशी झोप मिळण्यासाठी पालकांनी आपली जीवनशैली बदलणे गरजेचे आहे. जवळच्या शाळांना डावलून दूरवरच्या शाळांत मुलांना शिकवण्याचा निर्णयही झोपेवर परिणाम करत आहे.
ख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ या अभियानाच्या शुभारंभप्रसंगी महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांनी मुलांची झोप पूर्ण होण्याच्या दृष्टीने शाळांच्या सकाळच्या वेळा बदलण्याची सूचना केलेली आहे. या सूचनेमुळे संपूर्ण समाज ढवळून निघाला आहे. राज्यपालांची सूचना असल्यामुळे त्याला विशेष महत्त्व आहे; परंतु सध्या संपूर्ण महाराष्ट्राची शैक्षणिक पाहणी केली असता असे जाणवले की, आजही महाराष्ट्रामध्ये बहुतांश शाळांसाठी पुरेशा इमारती नाहीत. ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थी देवळांमधून किंवा हॉलमधून, पडवीमधून शिक्षण घेत आहेत. ज्या शाळांमध्ये इमारती आहेत त्या शाळांमध्ये इयत्ता बालवाडीपासून ते दहावी-बारावीपर्यंतचे वर्ग आहेत. आपली लोकसंख्या पाहता सर्व शाळांमध्ये विद्यार्थीसंख्या भरपूर प्रमाणात आहे. त्यामुळे असलेल्या इमारतीमध्ये एका शिफ्टमध्ये हे संपूर्ण वर्ग आयोजित करता येत नाहीत. म्हणून शाळांच्या वेळा दोन शिफ्टमध्ये केलेल्या आहेत, हेही विचारात घेणे गरजेचे आहे.
फार पूर्वीपासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्राथमिक शाळांचे वर्ग सकाळच्या सत्रामध्ये व माध्यमिक शाळांचे वर्ग दुपारच्या सत्रामध्ये आहेत. हे योग्य आहे असे वाटत नाही. माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांचे वय १२ वर्षांपासून पुढचे आहे आणि प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांचे वय ३ ते १० वर्षापर्यंतचे आहे. त्यामुळे प्रत्यक्षात प्राथमिक शाळा दुपारी हव्यात आणि माध्यमिक शाळा सकाळी हव्यात, हा भाग पटण्यासारखा आहे. परंतु शाळा ९ किंवा १० वाजल्यापासून करा हे म्हणणे सयुक्तिक नाही. कारण राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार कमीत कमी ६ तासांची शाळा असावी असे म्हटले आहे. अशा वेळी जर शाळा सुरू होण्याची वेळ सकाळी नऊची केल्यास प्राथमिक आणि माध्यमिक अशा दोन्ही सत्रांमधील शाळा रात्री आठ वाजेपर्यंत सुरू ठेवाव्या लागतील. हे कितपत योग्य आहे याचाही विचार आपल्याला यानिमित्ताने करायला हवा. केवळ वेळा बदला असे म्हणून आपल्याला चालणार नाही. सर्वांत प्रथम शिक्षण विभागाने सर्व शाळांच्या इमारती अद्ययावत कराव्यात, मगच अशा योजनांची कार्यवाही करावी. शिक्षणाचे सार्वत्रीकरण झाल्यामुळे स्वातंत्र्यप्राप्तीपासून आपण शिक्षणाचा प्रसार आणि प्रचार याबाबतीत आपण भरपूर प्रगती केलेली आहे. जवळजवळ ९० टक्के विद्यार्थ्यांचे शाळेमध्ये जाण्याचे प्रमाण वाढलेले आहे. ही बाब कौतुकास्पदच आहे. परंतु यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या वाढून त्याचा भार शालेय इमारतींवर येत आहे. त्यामुळेच आज अनेक ठिकाणी दोन सत्रांमध्ये शाळा भरवाव्या लागत आहेत. अशा स्थितीत सकाळच्या सत्रातील वेळ ताबडतोब बदलणे हे उचित ठरणारे नाही. त्याबाबतीत योग्य ते संशोधन होऊन मगच निर्णय घ्यायला हवा. अन्यथा कोणीतरी जबाबदार व्यक्ती बोलते आहे म्हणून लगेच निर्णय घेतला हे शिक्षणात बसत नाही. शिक्षणाच्या बदलाचा परिणाम दीर्घकाळ होत असतो. तो संपूर्ण समाजावर होत असतो, याचाही विचार यानिमित्ताने करण्याची गरज आहे. प्रायोगिक तत्त्वावर याची प्रथम प्रयोग करण्याची आवश्यकता आहे. नंतर सार्वत्रीकरणाकडे जाण्याचा विचार केला पाहिजे.
खरे म्हणजे, शाळेच्या वेळा या गोष्टीवर विचार करण्यापेक्षा आपल्यासमोर असलेला शाळांची गुणवत्ता हा प्रश्न अधिक महत्त्वाचा आहे. शाळेच्या वेळा हा त्या दृष्टिकोनातून प्राधान्य क्रमांक एकचा विषय अजिबात नाही. शासनाने प्रथमत: शाळांची गुणवत्ता, मुलांची गुणवत्ता, शिक्षकांची गुणवत्ता, संस्थेची गुणवत्ता याबाबतीत विचार करणे गरजेचे आहे. आज संपूर्ण महाराष्ट्रात ९० टक्के शाळांमध्ये पुरेसे शिक्षक नाहीत. विद्यार्थ्यांना गणित, इंग्रजीसारखे विषय शिकवण्यासाठी शिक्षक नाहीत. शाळांमध्ये साधनसामग्री कमी प्रमाणात आहे. तंत्रज्ञानाच्या बाबतीत विचार करता इंटरनेट किंवा वायफायची सुविधा नाही. या सर्व गोष्टी गुणवत्तेशी निगडीत आहेत. त्यामुळे प्रथमत: याचा विचार व्हावा. कारण त्याच्याशी विद्यार्थ्यांची गुणवत्ता निगडीत आहे. त्यामुळे केवळ शासनानेच नव्हे तर सर्व समाजाने वेळेच्या मुद्यापेक्षा शाळांची गुणवत्ता कशी वाढवता येईल, याविषयी आधी विचार करण्याची गरज आहे.
आज महाराष्ट्राचे शैक्षणिक विश्लेषण केल्यास पालक यातील अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. पालकांनी जर ठरवले माझ्या मुलाला मी एक किलोमीटरच्या आतील शाळेमध्येच प्रवेश घेईन, तर या शाळांच्या वेळेचा प्रश्नच निर्माण होत नाही. परंतु पालक आपल्या जवळच्या शाळा सोडून देतात आणि आपल्या मुलाला सहा-सात किलोमीटर दूर अंतरावरील शाळांमध्ये प्रवेश घेतात, हे कितपत योग्य आहे. सर्व शाळांमधून मिळणारे शिक्षण, अभ्यासक्रम कमी-अधिक फरकाने सारखाच आहे. पण तरीही विनाकारण चांगल्या शाळा-वाईट शाळा हा संबोध पालकांनी निर्माण केलेला आहे. तो समाजातून घालवला पाहिजे. शाळांनीही याचा विचार करण्याची गरज आहे. तसे झाल्यास शाळेच्या वेळेचा प्रश्न निर्माण होणार नाही. आस्ट्रेलियामध्ये असा एक नियम आहे की आपल्या मुलाला शाळेत घालावयाचे असेल तर ज्या प्रभागात आपण राहता त्याच प्रभागात मुलगा शिकला पाहिजे. दुस-या प्रभागात त्याला प्रवेशच मिळत नाही. असे कठीण निर्णय महाराष्ट्र शासनाने विद्यार्थ्यांच्या प्रवेशाच्या बाबतीत घेतले पाहिजेत. आज आपल्या घरापासून विद्यार्थ्यांच्या शाळेपर्यंत मुलाला जायला एक ते दीड तास लागतो. याचा परिणाम मुलांच्या झोपेवर होत आहे. त्यामुळे मुलांना पुरेशी झोप मिळत नाही. मुले अस्थिर होताहेत. निराश होत आहेत. कंटाळून जात आहेत. यांचे शाळेत लक्ष लागत नाही. पण याचा विचारच कोणी करायला तयार नाही. त्याऐवजी तोच तोच विचार करत आहेत.
आता प्रश्न शिल्लक राहिला तो मुलांच्या झोपेचा. कोणत्याही वयोगटातील मुलगा जर रात्री दहा वाजता झोपला आणि सकाळी सहा वाजता उठला तर त्याची आठ तास झोप होते. आरोग्याच्या दृष्टिकोनातून आठ तास झोप पुरेशी समाधानकारक, आरोग्यदायी आहे. परंतु गेल्या काही वर्षांत आपली जीवनशैली आपण अत्यंत नकारात्मक केलेली आहे. ७० टक्के मुलांच्या घरामध्ये पालक १२ वाजता झोपतात. त्यामुळे मुलेही १२ वाजता झोपतात. परिणामी, पालकांचीही झोप पूर्ण होत नाही आणि मुलांचीही झोप होत नाही. याला जबाबदार शाळांच्या वेळा नाहीत तर आपली जीवनशैली आहे. या चुका समाजाच्या आणि पालकांच्या आहेत. पालकांनी कठोर निर्णय घेऊन जर १० वाजता विद्यार्थी कसल्याही परिस्थितीत झोपेल असे ठरवले तर हे प्रश्नच निर्माण होणार नाहीत. विद्यार्थी दहा वाजता झोपायचे असतील तर शाळांनीही त्यांना गृहपाठ किती द्यायचा, याचा विचार केला पाहिजे. आज सर्वच माध्यमांच्या शाळांत अनेक विषय असल्यामुळे सगळ्याच विषयांचे गृहपाठ विद्यार्थ्यांना देतात. हा गृहपाठ इतका मोठा असतो की, तो पूर्ण करण्याच्या दबावाने विद्यार्थी तणावाखाली राहतात. केवळ विद्यार्थीच नव्हे तर पालकही तणावाखाली असतात. शाळांनी यावर विचार करण्याची गरज आहे. कोणत्या वयोगटातील मुलगा आहे आणि त्याला किती गृहपाठ द्यायचा आहे, याचा साकल्याने विचार शाळांनी करण्याची आवश्यकता आहे. शाळेमध्ये तुम्ही उत्तम शिकवा. म्हणजे मुलाला घरी कमीतकमी अभ्यास केला तरी विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहामध्ये उत्तम राहील. हा विचार शाळा कधी करणार आहेत? पालक शाळांना हे कधी विचारणार आहेत?
सारांश, शाळेच्या वेळेच्या बाबतीत बाऊ करू नये असे मला प्रामाणिकपणे वाटते. आरोग्याच्या दृष्टिकोनातून विद्यार्थ्यांची झोप पुरेशी उत्तम होणे आवश्यक आहे, हे कटू सत्य आहे. कारण पुरेशी झोप मिळाल्यामुळे विद्यार्थ्यांची एकाग्रता वाढेल. विद्यार्थ्यांचे अभ्यासात लक्ष देण्याचे प्रमाण वाढेल. कंटाळा येण्याचे प्रमाण कमी होईल. हे सगळे मान्यच आहे. परंतु त्याची विरुद्ध बाजू काय आहे तीही विचारात घेणे गरजेचे आहे. माझ्या मते, माध्यमिक शाळा सकाळी आणि प्राथमिक शाळा दुपारी हा यातील उत्तम मार्ग आहे. याखेरीज आरोग्याच्या दृष्टिकोनातून विचार केल्यास त्यासाठी आपला आहार, व्यायाम, ध्यानधारणा, प्राणायाम याची गरज आहे. या जर गोष्टी केल्या तर झोपेची गुणवत्ता वाढते, असे संशोधनाचे निष्कर्ष सबंध जगात प्रकाशित झालेले आहेत. त्यामुळे सर्वांनी मुलांना उत्तम झोप मिळेल याचा विचार करावा असे सुचवावे वाटते.
-डॉ. अ. ल. देशमुख, ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ