पुणे : राज्य सरकारच्या प्राथमिक आणि माध्यमिक शाळा आजपासून सुरू झाल्या आहेत. तर विदर्भातील शाळा या १ जुलैपासून सुरू होणार आहेत. शाळेच्या पहिल्याच दिवशी राज्यातील सर्वच शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. दरवर्षी राज्यातील शाळा या १३ जून रोजी सुरू होत असतात. मात्र, यावर्षी राज्यातील शाळा १५ जूनपासून सुरू करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला होता. त्यानुसार आजपासून राज्यातील प्राथमिक आणि माध्यमिक शाळा सुरू झाल्या आहेत.
राज्यातील शाळेचा पहिला दिवस हा प्रवेशोत्सव म्हणून साजरा केला. जिल्हा परिषदेच्या, नगर परिषदेच्या तसेच खासगी शाळांत विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी जोरदार तयारी करण्यात आली आहे. नवीन वह्या, पाठ्यपुस्तके, नवे दप्तर घेऊन विद्यार्थ्यांनी शाळेत हजेरी लावली. पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके देण्यात येणार आहेत.
दरम्यान शाळेच्या पहिल्या दिवशी सकाळी ८ ते ९ या वेळेत शाळेचा परिसर स्वच्छ करण्यात यावा. तसेच ७ ते साडेसात वाजता शाळेच्या परिसरात प्रभातफेरी काढण्यात यावी. त्यानंतर शाळेत येणा-या विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके आणि फुले देऊन त्यांचे स्वागत करावे अशा सूचना शिक्षण विभागाने प्रत्येक शाळेला दिल्या होत्या.