33.3 C
Latur
Wednesday, April 23, 2025
Homeलातूरशाश्वत भविष्यासाठी निसर्गाचे संरक्षण करावे : कुलगुरू डॉ. इंद्र मणी

शाश्वत भविष्यासाठी निसर्गाचे संरक्षण करावे : कुलगुरू डॉ. इंद्र मणी

लातूर : प्रतिनिधी
गेल्या काही दशकामध्ये मानवी हस्तक्षेपामुळे पर्यावरणाचा ह्रास मोठ्या प्रमाणात झाला असून औद्योगिकरण, शहरीकरण, वाढते प्रदूषण, जंगलतोड यामुळे हवामान बदल होऊन पाऊसामध्ये खंड पडत आहे. भूजलाची पातळी कमी होऊन वन्य जीव व वनस्पती धोक्यात आल्या आहेत. इथून पुढे शाश्वत भविष्यासाठी आपण सर्वानी निसर्गाचे संरक्षण करणे आपले कृतव्य आहे असे समजून कार्य करावे, असे वनामकृवि परभणी चे कुलगुरू डॉ. इंद्र मणि म्हणाले.
जागतिक वसुंधरा दिनाचे औचित्य साधून कृषि महाविद्यालय, लातूर येथे पर्यावरण जनजागृती महामेळाव्याचे उद्घाटन वनामकृविचे शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून पर्यावरण अभ्यासक अतुल देऊळगावकर, डॉ. चिन्मयी देऊळगावकर, डॉ. बाबासाहेब ठोंबरे, पत्रकार प्रदीप नणंदकर, नोडल अधिकारी मोहन गोजमगुंडे, चेतन जाधव, अधिष्ठाता डॉ. संतोष कांबळे, एम. बी. गाजरे उपस्थित होते.
यावेळी देऊळगावकर म्हणाले की, ऋतू बदल झाल्यामुळे २२ दिवस प्रत्येक हंगाम पुढे सरकला आहे. २०२० पासून दिवसाच्या बरोबरीने रात्रीचे हि तापमान वाढत गेले असून एकाच वेळी उष्ण व दमट होत जाणा-या भारतीय शहरांना उष्णतेची बेट चे स्वरूप आले आहे. २०२४ साली बदलत्या वातावरणाचे वर्णन करताना औद्योगिकरण पूर्वीच्या काळापेक्षा सध्याचे तापमान हे १.७५ अंश सेल्सियस ने वाढल्याचे नमूद करण्यात आले. वाढते उष्णतामान कमी करण्यासाठी वृक्ष लागवड करून प्रत्येक गाव शहर रस्ते, इमारती, पडीक जमिनी या सर्वाना हरितसृष्टीचे स्वरूप द्यावे लागेल. अति उष्णतापमानात ऑक्सिजनचे प्रमाण कमी होऊन मानवी आरोग्यास धोका निर्माण होत असल्याची जाणीव करून देत असताना एका झाडापासून ९८ किलो ऑक्सिजन आपणास मिळतो हे सांगितले.
डॉ. चिन्मयी देऊळगावकर यांनी शेतीतील विविध प्रमाणीकरण बाबत विविध विषयावर सविस्तर असे मार्गदर्शन केले ननंदकर यांनी लातूर शहरातील वृक्षलागवड चळवळ याबाबत सांगताना शेकडो लोक दररोज पहाटे पासून श्रमदानातून शहरभर वृक्ष लागवड संगोपन आणि संवर्धन करत असल्याचे सांगितले. गाजरे यांनी शाश्वत शेती उपक्रमाची माहिती दिलीे. यावेळी डॉ. आसेवार यांनी पर्यावरण सरंक्षण, कोरडवाहू शेती व्यवस्थापन, रुंद सरी वरंबा पद्धती, नैसर्गिक संसाधनांचा शेतीमध्ये वापर करून हवामान बदलायच्या समस्येला तोंड देण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करावा असे सांगितले.
तसेच डॉ. ठोंबरे यांनी ‘आपली ऊर्जा, आपली वसुंधरा’ चे महत्व विशद करताना अक्षय ऊर्जा स्रोताची माहिती दिली. सौर ऊर्जा, पवन ऊर्जा अश्या अक्षय ऊर्जा तसेच नैसर्गिक साधनसंपत्तीचा वापर करावा लागण्याचे महत्व विशद केले. कृषि महाविद्यालय परिसरात २ लक्ष वृक्ष लागवड आणि संवर्धनाचे कार्य सुरु असून १ विद्यार्थी ५ वृक्ष हे अभियान मागील २ वर्षांपासून राबविण्यात येत आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ. बाबासाहेब ठोंबरे यांनी केले. सूत्रसंचालन दयानंद माने यांनी केले. तर अमोल ढवण यांनी आभार व्यक्त केले.
………………………..८……………………………

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR