मुंबई (प्रतिनिधी) : सर्वोच्च न्यायलयाने दिलेल्या निर्देशांचे तंतोतंत पालन करूनच आपण आमदार अपात्रतेबाबतच्या याचिकेवर निर्णय दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने अपात्रतेबाबत निर्णय घेताना सर्वप्रथम मूळ राजकीय पक्ष कोणाचा हे ठरवण्यास सांगून त्यासाठी कोणते निकष गृहीत धरले जावेत, ते सांगितले होते. आपल्यावर आरोप करण्यापूर्वी निकालपत्र वाचावे, समजत नसेल तर तज्ज्ञांकडून समजावून घ्या, असा सल्ला देताना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी, शिंदे गटाच्या भरत गोगावले यांचा व्हीप ठाकरे गटातील आमदारांनाही लागू राहील, असे स्पष्ट केले.
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी बुधवारी शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल दिला. शिंदे गट म्हणजेच खरी शिवसेना असल्याचा निर्वाळा त्यांनी दिल्यानंतर राजकीय वर्तुळात आरोप – प्रत्यारोपांचा धुरळा उडाला आहे. या पार्श्वभूमीवर एका वृत्तवाहनीला दिलेल्या मुलाखतीत राहुल नार्वेकर यांनी सर्व बाबींची स्पष्टता केली आहे. सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईन्सचं तंतोतंत पालन करूनच आपण आमदार अपात्रतेचा निर्णय दिला आहे. कमी वेळेत अत्यंत किचकट विषय सोडवण्याची जबाबदारी माझ्यावर होती. त्यासाठी दिवसाला १५ ते १६ तास काम करीत होतो. नागपूर अधिवेशनाच्या दरम्यान अधिवेशन सभागृहात उपस्थित राहून आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी घेतली. सर्वोच्च न्यायालयाने दिलेली जबाबदारी पार पाडण्यासाठी मी पूर्ण प्रयत्न केलेला आहे. सर्वोच्च न्यायालयानेच राजकीय पक्ष ठरवण्याचा अधिकार मला दिला होता. मूळ राजकीय पक्ष ठरवल्याशिवाय कोणाचा व्हीप लागू होईल हे ठरवता येत नव्हते. म्हणून मी सर्वप्रथम मूळ राजकीय पक्ष शिंदे की ठाकरे यावर निर्णय दिला. शिवसेनेच्या संविधानाचा विचार केला तर ठाकरे गटांनी दिलेली २०१८ ची शिवसेनेची घटना ग्रा धरायची की शिंदे गटाच्या मागणीप्रमाणे १९९९ च्या घटनेचा आधार घ्यायचा? असा प्रश्न होता. या संदर्भातही सुप्रीम कोर्टाने स्पष्टपणे सांगितलेलं की, दोन पक्ष दोन वेगवेगळे दाखले देत असेल तर निवडणूक आयोगाकडील घटना ग्रा धरावी. त्यानुसार निवडणूक आयोगाच्या अधिकृत रेकॉर्डवर असणारी घटनेची प्रत मागवली. निवडणूक आयोगाने १९९९ सालची घटना आम्हाला दिली व त्यानुसार निर्णय घेण्यात आल्याचे अध्यक्षांनी स्पष्ट केले.
गोगावलेंचा व्हीप शिवसेनेच्या सर्व आमदारांना लागू होणार
सुप्रीम कोर्टाने सुनील प्रभू यांची नियुक्ती कायमस्वरुपी योग्य ठरवली आणि गोगावलांची नियुक्ती अयोग्य ठरवली, असा गैरसमज पसरवला जातोय. वस्तुस्थिती तशी नाही. सुप्रीम कोर्टानेच मूळ राजकीय पक्ष कुणाचा हे ठरवण्यास सांगितले होते. मूळ राजकीय पक्ष ठरवल्यानंतर भरत गोगावले यांची प्रतोद पदावरील नियुक्ती कायम झाली आहे. आता अध्यक्षांच्या समोर केवळ एकच शिवसेना विधिमंडळ गट अस्तित्वात आहे, असे सांगत गोगावले यांचा व्हीप ठाकरे गटातील आमदारांनाही लागू राहील, असे त्यांनी स्पष्ट केले.
…म्हणून ठाकरे गटाचेही आमदार पात्र ठरले
ठाकरे गटातील आमदारांच्या अपात्रतेबाबत शिंदे गटाने दाखल केलेली अपात्रता याचिकाही अध्यक्षांनी फेटाळली आहे. याबाबत विचारता नार्वेकर म्हणाले, गोगावले यांना व्हीप देण्याचा अधिकार होता; परंतु तो योग्यरित्या बजावला गेला नाही. तुमचा व्हीप समोरच्याला मिळालाच नसेल तर त्याच्याकडून त्या अपेक्षित कार्याची तुम्ही अपेक्षा कशी करू शकता? असा प्रश्न असल्याने ही याचिका फेटाळण्यात आल्याचे नार्वेकर यांनी स्पष्ट केले.