22.1 C
Latur
Sunday, September 8, 2024
Homeमहाराष्ट्रशिंदेंच्या ५ जागा धोक्यात!

शिंदेंच्या ५ जागा धोक्यात!

मुंबई : प्रतिनिधी
राज्यात ४५ पेक्षा जास्त खासदार निवडून आणायचे लक्ष ठेवलेल्या महायुतीत काही जागांवरून बेबनाव वाढत आहे. राज्यात अनेक ठिकाणी जगावाटावरून महायुतीत तिढा निर्माण झाला आहे तर काही ठिकाणी उमेदवार जाहीर होऊनही स्थानिक कार्यकर्त्यांकडून उमेदवाराबाबत नाराजी व्यक्त होत आहे. त्यातल्या त्यात शिंदेंच्या शिवसेनेच्या काही उमेदवारांना भाजपचा विरोध असून त्या ठिकाणी उमेदवार बदलाची मागणी केली जात आहे. दरम्यान, भाजपमुळे शिंदे गटाच्या शिवसेनेच्या ५ जागा धोक्यात असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आतापर्यंत ८ उमेदवार जाहीर करण्यात आलेले आहेत. महायुतीचे जागावाटप अद्याप जाहीर झाले नसले तरी शिंदेंच्या वाट्याला १२ किंवा १३ जागा येणार असल्याची माहिती आहे. शिंदेंनी चार ते पाच ठिकाणच्या खासदारांना पुन्हा तिकीट देऊ नये, अशी भूमिका भाजपने घेतली होती. त्यामध्ये नाशिक, हातकणंगले, यवतमाळ-वाशिम आणि हिंगोलीचा समावेश होता तर ठाण्याची जागा कोणत्याही परिस्थितीत आपल्याला मिळावी, असा आग्रह भाजपचा आहे.

एकनाथ शिदेंनी हातकणंगल्यातून धैर्यशील माने यांना तर हिंगोलीतून हेमंत पाटील यांना पुन्हा उमेदवारी दिली तर यवतमाळ आणि नाशिकचा उमेदवार जाहीर केलेला नाही. यावरूनही भाजप-शिवसेनेत दावे-प्रतिदावे आहेत. यासोबतच ठाण्यावरही भाजपने दावा केला आहे. हिंगोलीत शिवसेनेने पुन्हा हेमंत पाटील यांना उमेदवारी दिली असली तरी त्यांना भाजपचा विरोध कायम आहे. याच मुद्यावरून नांदेडमध्ये हेमंत पाटील यांचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. त्यामुळे हा वाद उफाळण्याची शक्यता आहे.

हातकणंगलेतून शिवसेनेने धैर्यशील माने यांच्या नावाची घोषणा केली. पण त्यांना भाजपचा आधीपासून विरोध होता. हातकणंगल्याची जागा ही भाजपने लढवावी अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली होती. त्यामुळे आवाडे गट आणि भाजपचे इच्छुक संजय पाटील आक्रमक झाले आहेत. त्यामुळे त्यांनाही भाजपच्या नाराजीचा फटका बसू शकतो, असे बोलले जात आहे. तसेच भाजपने येथेही धैर्यशील माने यांच्या विरोधात नकारात्मक वातावरण असल्याचा अहवाल दिला आहे.

नाशिकमधून शिंदे गटाचे हेमंत गोडसे यांना विरोध असल्याने अद्याप त्यांची उमेदवारी जाहीर केलेली नाही. तिकीट कापले जाणार असल्याचे लक्षात येताच गोडसेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे पाठपुरावा केला. तरीही भाजपचा विरोध कायम आहे. काही पदाधिका-यांनी तर राजीनाम्याची धमकी दिली आहे. त्यामुळे गोडसेंऐवजी येथे राष्ट्रवादी अजित पवार गटाला ही जागा सुटण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिंदे गटाला हीदेखील जागा गमवावी लागणार आहे.

भावना गवळींची उमेदवारी धोक्यात?
शिंदे गटाच्या यवतमाळ-वाशिमच्या खासदार भावना गवळी यांच्या नावालाही भाजपचा विरोध आहे. या मतदारसंघात भावना गवळी ५ वेळा निवडून आल्या आहेत. यावेळी उमेदवारी मिळवताना त्यांना संघर्ष करावा लागत आहे. त्यातच त्यांच्या उमेदवारीला भाजपचा विरोध आहे. त्यांनी संजय राठोड यांचे नाव पुढे केले आहे. तसे झाल्यास गवळींना धक्का बसणार आहे.

ठाण्यावरही भाजपचा दावा
मुख्यमंत्र्यांचा बालेकिल्ला अशी ओळख असलेल्या ठाण्याच्या जागेवर भाजपने दावा केल्याने नवा तिढा निर्माण झाला आहे. कल्याण किंवा ठाणे या दोन्हीपैकी एक जागा ही भाजपला मिळावी, असा भाजपचा आग्रह आहे. भाजपची वैचारिक बैठक पक्की करणारे रामभाऊ म्हाळगी आणि राम कापसे यांनी या मतदारसंघाचे नेतृत्व केले आहे. एकेकाळी आनंद दिघेंनी शिवसेनेसाठी काढून घेतलेला हा मतदारसंघ आता भाजपला हवा आहे.

भाजप सर्व्हेच्या नावावर फसवत असल्याचा आरोप
माजी मंत्री सुरेश नवले यांनी भाजपवर कडाडून हल्लाबोल केला. भाजप सर्व्हेच्या नावावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना फसवत असल्याचा आरोप केला. उमेदवार देण्यावरून भाजप शिंदेंवर दबाव टाकत असल्याचा आरोप केला. मात्र, अशा दबावाला शिंदे साहेब जुमानत नाहीत, असे ते म्हणाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR