मुंबई : प्रतिनिधी
स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा याने राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना उद्देशून सादर केलेल्या व्यंगात्मक गाण्यामुळे मोठा वाद निर्माण झाला असून, या कुणाल कामरा विरोधात शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. कुणाल कामराने केलेल्या या टिप्पणीनंतर त्याच्या शोच्या सेटवर धडक देत शिवसैनिकांनी सेटची मोडतोड केली. यावरून आता राजकीय वर्तुळात प्रतिक्रिया उमटत असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही यासंदर्भात स्पष्ट शब्दांत भाष्य केले आहे. तर दुसरीकडे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी शिंदे गटातील लोकांवर एफआयआर दाखल करण्याची मागणी केली आहे.
कुणाल कामराबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. या वादाला तोंड फुटल्यानंतर कुणाल कामरा हा महाराष्ट्राबाहेर पसार झाल्याचा दावा करण्यात येत आहे. तसेच त्याचा फोनही बंद असल्याची माहिती मिळत आहे. कुणाल कामराने केलेले विधान आणि त्याच्यावरील पुढील कारवाईबाबत अधिक माहिती देताना गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी सांगितले की, या प्रकरण्यात जी कुणी व्यक्ती आहे त्याच्याविरोधात कठोर कारवाई केली जाईल. कुणाल कामराचे लोकेशन ट्रेस करण्याचे काम सुरू आहे. तो कुठे आहे, हे आम्हाला माहिती नाही. मात्र त्याचे लोकेशन तपासण्याचे काम केले जात आहे. यानंतर आता अंजली दमानिया यांनी एक्सवर एक पोस्ट शेअर करत संताप व्यक्त केला आहे.
अंजली दमानिया यांनी एक्सवर शिवसैनिकांनी सेटची मोडतोड केली, त्या घटनेचे व्हिडिओ शेअर करत तीव्र शब्दांत प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. कुणाल कामरा जे म्हणाले ते जर आवडले नसेल तर त्यांच्या विरुद्ध कायद्याने लढणे अपेक्षित आहे. पण स्वत: सत्तेत असताना कायदा हातात घेऊन हॉटेलमध्ये शिवीगाळ करणे, तोडफोड करणे ह्याला गुंड प्रवृत्ती म्हणतात, जी आपल्याला दिसली. कामरावर सोडा आधी ऋकफ हा शिंदे गटाच्या ह्या सगळ्यांवर झाला पाहिजे. त्या हॉटेलचे झालेले नुकसान सुद्धा शिंदेंनी भरून दिले पाहिजे. आपण लोकशाहीत राहतो आणि इथे कायद्याचे राज्य राहील, गुंडगिरीचे नाही, असे अंजली दमानिया यांनी म्हटले आहे.
दरम्यान, कुणाल कामराला हे माहिती पाहिजे की २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत कोण गद्दार आहे आणि कोण खुद्दार आहे हे जनतेने दाखवून दिले आहे. कोणाकडे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची विरासत गेली हे जनतेने ठरवलेले आहे. त्यामुळे अशा प्रकारे खालच्या दर्जाची कॉमेडी करून राज्याचे उपमुख्यमंत्री आणि ज्यांच्या बद्दल जनतेच्या मनात आदर आहे त्यांचा अनादर करण्याचा कोणालाही अधिकार नाही. हे अत्यंत चुकीचे आहे तुम्ही कॉमेडी करा पण जर अपमानित करण्याचे काम कोणी करत असेल तर हे सहन केले जाणार नाही. कुणाल कामराने माफी मागितली पाहिजे. ते संविधानाचे पुस्तक दाखवत आहे. त्यांनी जर ते वाचले असेल तर संविधानाने सांगितलेले आहे की स्वातंर्त्याचा स्वैराचार करता येणार नाही. दुस-याच्या स्वातंर्त्यावर तुम्हाला अतिक्रमण करता येणार नाही. त्यामुळे आमची मागणी आहे की कुणाल कामराने माफी मागितली पाहिजे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे.