मुंबई : ‘ऑपरेशन टायगर’ होईल, ‘ऑपरेशन कमळ’ होईल, मात्र ऑलरेडी ऑपरेशन ‘रेड्याची शिंग’ झालेले आहे. राज्यात ‘ऑपरेशन टायगर’ची केवळ अफवा पसरवल्या जात असल्याचे उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. शिंदे गटाचे नेते चुकीचा आकडा सांगत आहेत असे म्हणत शिंदे गट भाजपच्या पोटातील अपेंडिक्स आहे अशी टीका केली आहे.
विधानसभा निवडणुकीनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची तयारी सर्वच राजकीय पक्षांकडून केली जात आहे. मात्र, तत्पूर्वीच पक्षाची ताकद वाढवण्यासाठी शिवसेनेच्या वतीने ‘ऑपरेशन टायगर’ची तयारी सुरू असल्याचे म्हटले आहे. आता या ऑपरेशन टायगरच्या माध्यमातून ठाकरे गटाचे सहा खासदार आगामी संसदेच्या अधिवेशनाच्या आधी शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असण्याची चर्चा आहे. याला खासदार संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिले आहे. शिंदे गटाचे नेते चुकीचा आकडा सांगत आहेत. त्यांनी पैकीच्या पैकी आकडा सांगायला हवा, असा खोचक सल्ला देखील त्यांनी दिला.
या संदर्भात संजय राऊत म्हणाले की, कालच आम्ही आमच्या संसदेतील कार्यालयाचे उद्घाटन केले. आमचे सर्व खासदार तेथे उपस्थित होते. त्यांनी सहा आकडा चुकीचा सांगितला आहे. त्यांनी पैकीच्या पैकी आकडा सांगायला हवा होता. वास्तविक त्यांनी स्वत:ची वैद्यकीय तपास पूर्ण केली पाहिजे. ते कोणत्या गुंगीत आहेत? असा प्रश्न राऊत यांनी उपस्थित केला. आज विरोधी पक्ष नेते राहुल गांधी पत्रकार परिषद घेणार आहे. महाराष्ट्रातील निवडणुकीच्या काळात झालेल्या घोटाळ्याची पुराव्यानिशी माहिती ते देणार असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
रोज ऑपरेशन सुरू आहे
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे रोज एकनाथ शिंदे यांच्या गटाचे ऑपरेशन करत आहेत. रोज त्यांचा अपमान होत आहे. शिंदे गट हा भारतीय जनता पक्षाच्या पोटात आलेला अपेंडिक्स आहे. तो कधीही काढला जाईल, अशा शब्दात संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे गटावर टीका केली आहे.