माजी नगरसेवक फोडल्याने शिंदे गटाची नाराजी
मुंबई : प्रतिनिधी
आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीमधील घटक पक्षांमधील विशेषत: शिवसेना आणि भाजप यांच्यातील मतभेद पुन्हा एकदा उघड झाले आहेत. अनेक ठिकाणी भाजपा नेत्यांकडून डिवचण्याचे प्रकार सुरू आहेत. त्यामुळे शिवसेनेतही स्वबळाचे नारे जोर धरू लागले आहेत. विशेषत: ठाणे, कल्याण-डोंबिवली, नाशिक आणि नवी मुंबईसारख्या महत्त्वाच्या ठिकाणी जागावाटपावरून आणि स्थानिक नेतृत्वाच्या मुद्यावरून वाद वाढला आहे. दुसरीकडे अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदे सेनेतही टोकाचे मतभेद आहेत.
दरम्यान, भाजपकडून युतीधर्म पाळला जात नसल्याचा आणि शिवसेनेची ताकद कमी करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप शिवसेनेचे स्थानिक नेते करत आहेत. या वाढत्या संघर्षामुळे आगामी पालिका निवडणुकांमध्ये महायुती म्हणून एकत्र लढण्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दरम्यान, काही शिवसेनेचे माजी नगरसेवक भाजपमध्ये दाखल झाले आहेत. त्यावरूनही शिंदे गट आणि भाजपमध्ये नाराजी वाढली आहे. यावर खा. नरेश मस्के यांनी महायुती विरोधकांना संपविण्याकरिता झाली आहे. परंतु आता महायुतीमधील पक्ष मित्रपक्षांचेच माजी नगरसेवक फोडण्याच्या मागे लागले आहेत. भाजप मोठा भाऊ आहे. परंतु तेच आमचे पदाधिकारी फोडत आहेत. हा महायुतीत मिठाचा खडा टाकण्याचा प्रकार आहे, अशा शब्दांत त्यांनी नाराजी व्यक्त केली.
एकमेकांचे नगरसेवक फोडणे चुकीचे
एकमेकांचे नगरसेवक फोडण्याची प्रथा चुकीची आहे. एकमेकांसोबत लढायचे तर लढूया, जरी आपण स्वबळावर लढलो तरी आपल्या मित्र पक्षावर टीका करायची नाही, परंतु एकमेकांचे माणसे फोडणे हे चुकीचे आहे, असे शिवसेना शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के म्हणाले.
युतीबाबत संभ्रम
एकीकडे महायुतीत धुसफूस सुरू असतानाच तीनही पक्षांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत युती करायची की नाही, याबाबत अद्याप कोणताही निर्णय झाल्याचे चित्र नाही. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत तीनही पक्ष महायुती म्हणून लढू शकतात. पण इतर ठिकाणचा निर्णय स्थानिक पातळीवर घेतला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे युतीबाबत संभ्रम कायम आहे.