डोंबिवली : प्रतिनिधी
डोंबिवलीतील सुनीलनगरमध्ये कवयित्री बहिणाबाई चौधरी उद्यानात तयार करण्यात येणा-या वाचनालयावरून शिवसेना शिंदे आणि ठाकरे गटात जोरदार जुंपली आहे. या उद्यानात होत असलेल्या वाचनालयास शिवसेना ठाकरे गटाचा विरोध आहे. यामुळे दोन्ही गट आमने-सामने आले असून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्यात येत आहेत.
डोंबिवली पूर्वेतील सुनीलनगरमध्ये कवयित्री बहिणाबाई चौधरी उद्यान आहे. या उद्यानात लहान मुले, महिला, वयोवृद्ध येतात. तर याच उद्यानात खासदार श्रीकांत शिंदे यांच्या निधीतून वाचनालय तयार होणार आहे. या कामाची पाहणी रविवारी काही अधिकारी वर्गाकडून करण्यात आली. हे काम शिवसेना शिंदे गटाचे माजी नगरसेवक नितीन पाटील यांच्याकडून होणार आहे. या वाचनालयाच्या कामाला स्थानिक नागरिकांसह शिवसेना ठाकरे गटाने विरोध केला आहे.
दरम्यान शिवसेना ठाकरे गटाचे शहरप्रमुख अभिजीत सावंत यांचे म्हणणे आहे की, हे उद्यान लहान मुलांसह वयोवृद्धांसाठी आहे. एखादे वाचनालय तयार झाले तर हे उद्यान लहान होईल. उद्यानाचा काही फायदा होणार नाही. त्याठिकाणी तयार करण्यात आलेली वास्तू तोडण्यात येईल. या गार्डनला आम्ही विरोध केला आहे. हे गार्डन आम्ही होऊ देणार नाही, अशी भूमिका काही नागरिकांनी देखील घेतली आहे.
पोटात दुखत असल्याने विरोधाची भूमिका
तर याबाबत शिवसेना शिंदे गटाचे नितीन पाटील यांनी सांगितले, की नागरिकांना विचारून हा प्रस्ताव केला आहे. २५ लाखांतून सुसज्ज असे उद्यान तयार होणार आहे. त्यात अत्याधुनिक सर्व सोयी-सुविधा असणार आहेत. काही लोकांचे पोट दुखते आहे, त्यामुळे ते विरोधाची भूमिका घेत आहेत. गार्डन परिसरात अनधिकृत बॅनरबाजी सुरू आहे. त्यावर का बोलत नाही? होणारे वाचनालय अधिकृत असून ते होणारच. आता या मुद्यावर शिवसेना ठाकरे गट आणि शिंदे गटात चांगलीच जुंपल्याने राजकारण तापले आहे.