मुंबई : शिवसेनेचे आमदार मुरजी पटेल यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या शिष्टमंडळाने मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर निदर्शने केली. यात त्यांनी मागणी केली की, विमानतळाने सेलेबी एनएएस एअरपोर्ट सर्व्हिसेस या तुर्की कंपनीशी असलेले संबंध तोडले आहेत.
शिवसेनेचे आमदार मुरजी पटेल या वेळी म्हणाले की, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली, आम्ही मुंबईत कार्यरत असलेल्या सर्व (तुर्की) कंपन्या बंद करण्यासाठी काम करू. भारतातून पैसे कमावून ते पाकिस्तानला मदत करण्यासाठी वापरल्याने त्यांना महाराष्ट्रात काम करता येणार नाही. आम्ही त्यांना कारवाई करण्यासाठी १० दिवसांचा अवधी दिला आहे. आमची मागणी मान्य झाली नाही तर आम्ही १० हजार नागरिकांसह मुंबई विमानतळावर ‘उग्र आंदोलन’ सुरू करणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
शिवसेनेचे युवा नेते अर्जुन कंधारी म्हणाले की, आजचे आंदोलन आपल्या देशाच्या सुरक्षेसाठी आहे. सेलेबी नावाची तुर्की कंपनी आपल्या मुंबई विमानतळावर काम करते ही राष्ट्रीय सुरक्षेची चिंता आहे. आम्ही पाकिस्तानला पाठिंबा देणा-या तुर्की कंपनीला भारतीय भूमीवर काम करू देणार नाही. ते भारतात पैसे कमावतात आणि नंतर पाकिस्तानला दहशतवादासाठी निधी देतात. आम्ही विमानतळाच्या मुख्य अधिका-यांना सेलेबीचे गंभीर मूल्यांकन करून पुढील १० दिवसांत त्यांचे कामकाज बंद करण्यास सांगितले आहे.
देशात तुर्कीला मोठ्या प्रमाणात विरोध
ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तानची मित्र राष्ट्रे तुर्की व अझरबैजानवर आता भारतीय नागरिकांनी स्ट्राइक केला. भारतात तुर्कीवर बहिष्काराची लाट सुरू झाली. देशातील अनेक प्रवासी कंपन्यांनी तुर्कीचे बुकिंग थांबवले. सरकारने या देशांत अनावश्यक प्रवास’ टाळण्याचा सल्लाही दिला. उन्हाळी हंगामात तुर्की-अझरबैजानला जाणा-या भारतीय पर्यटकांचे दौरे ऑपरेटर्सनी रद्द केले. दोन्ही देशांचे दौरे रद्द करण्याच्या प्रमाणात २५०% पर्यंत वाढ झाली आहे. सोशल मीडियावर लोक प्रतिक्रिया देत आहेत. तुर्कीने पाकला ३५० वर ड्रोन पुरवले. तुर्कीचे अध्यक्ष एर्दोगान पाकचे खरा मित्र म्हणून वर्णन करताहेत. हे दोन्ही देश आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर पाकिस्तानला पाठिंबा देत आहेत. त्यामुळे देशात तुर्कीला विरोध होत आहे.